सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ माझी दुपार ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
रोज सकाळी सूर्यनारायण आपल्या कोटी-कोटी किरणांच्या अनलशरा उधळत क्षितिजावर येऊ लागतो.त्याची कोवळी उन्हं धरेवर पसरू लागतात. ती अंगावर झेलतच दिवसाची सुरुवात होते. हळूहळू उन्हाची तिरीप अंगाला चटके देऊ लागते. तेच ऊन रणरणतं वाटू लागतं आणि दुपार रखरखीत!!
साहित्यिकांना कवींना सकाळ, संध्याकाळचं जितकअप्रूप तितकं दुपारचं नाही हं! या सर्वांकडून उपेक्षिलेली ही दुपार!
‘वेळ झाली भर माध्यान्ह!माथ्यावर तळपे ऊन!नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला’ असं एखादं कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेलं आर्त गीत जन्माला येते. हा त्याला अपवाद….
सकाळ नंतर येणारी आणि सांजेत विरून जाणारी ही दुपार माझी मात्र प्रियसखी!
‘सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं’ या ओळी मला माझ्या या प्रिय सखीला अर्पण कराव्याशा वाटतात. कारण ती थकलेल्या माझ्या गात्रांना सुखावते.
नव्या रुपात आणि नव्या ढंगात येणारी ही माझी सखी मला रोज नवीन वातावरणात घेऊन जाते.
सकाळी उठल्यापासून कामात गुरफटलेली मी दुपारी स्वतःला तिच्यात गुरफटून घेते. तिच्या उबदार दुलईत मीच परी असते.
ती कधीकधी अलवार स्वप्न सफरीवर मला नेते. मनावरचं मळभ दूर करून एखाद्या फुलासारखं टवटवीत करते. आणि मग, चहाचा भुरका मारून मी पुन्हा कामाला लागते.
कधीकधी मला शॉपिंग मेनिया जडतो. मी तिच्यासोबत मनसोक्त शॉपिंग करते.
तिच्यासोबत मी मनस्विनी असते. काही मनभावन वाचन करून स्वतःला रिझवते आणि अंतर्मुखही होते.
कधीतरी एखादी कविता सुचते. लिहिता लिहिता मी ती गुणगुणते. माझ्या सुरात ती गाते. तिच्यात तालात मी नाचते. कविता सजते आणि तिचा पदन्यास सुरू होतो.
तिच्यासोबत एखादा लेख लिहिते. आवडलेल्या लिखाणावर खुश होऊन स्मितहास्य करते. कधी लिहिता लिहिता भावूक होते.. डोळेही पाणावतात. मग मी तिला आणखीनच बिलगते.
माझी दुपार मला खूप काही शिकवते. दुपारच्या शाळेत फक्त मीच शिकते.
माझ्या सर्व सख्यांनाही ती मला भेटवते. मनमोकळ्या गप्पा मारायला लावून खूप हसवते.नातेवाईकांशी संवाद साधून नात्याची वीण आणखी घट्ट करते.
हक्काचा वेळ देणारी ही दुपार मला काही फावली कामं करण्यासाठी निवांतपणाही देते. सांडगे, पापड, कुरडया, लोणची, मसाले यांनी डबे उगीच का भरतात?
कधी कधी हिच्याच संगतीनं मी गाणी गाते, एखादा सुंदर चित्रपट पाहते, स्वतःला आरशात बघून सजते आणि ‘सजना है मुझे सजना के लिए’असे म्हणून गिरकीही घेते.
Kitty party असेल त्या दिवशी तिला माझ्यासोबत नेते. आजच्या राहिलेल्या गप्पा आम्ही दुसरे दिवशी मारतो.
रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या इतर स्त्रियांसाठी दुर्मिळ असणारी ही दुपार मला रोज भेटते याचा मला आत्यंतिक सुख वाटतं.
रविवारी येणारी ही दुपार थोडीशी निराळी. माझ्याबरोबरच कुटुंबात रमणारी, त्यांनाही स्वतःच्या अस्तित्वानं निवांत करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. पुढील आठवड्यासाठी खूप-खूप ऊर्जा देणारी अशी दुपार!
दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन देऊन ती तिच्या वेळेला निघून जाते. बाहेर संध्याकाळ तिची वाट बघत असते. तिला ओव्हर देऊन हिला जायचं असतं ना?
प्रत्येकाची दुपार ही ज्याची त्याची वैयक्तिक प्रॉपर्टीअसते प्रत्येकानं आपल्याला हवी तशी ती वापरावी आपल्याला हवी तशी खर्च करावी नाही का?….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈