☆ विविधा ☆ गणित ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
माणसाचे आयुष्य हे एक गणितच आहे नाही का? माणसाने जन्मभर नुसती गणितच तर सोडवायची असतात. कधी बेरीज तर कधी गुणाकार करायचा असतो कधी वजाबाकी तर कधी भागाकार, पण कधी आणि कुठे कोणती सूत्रे वापरायची हे मात्र त्याला समजले पाहिजे.
काय गंमत आहे नाही का? माणसाच्या आयुष्याची सुरवात होते ती गणिताने आणि शेवट ही गणितानेच होतो..
शाळेत आपण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार सारे काही शिकतो. अंकांशी खेळायला शिकतो. पण प्रत्यक्षातही आपल्याला जन्मभर तोच खेळ खेळायचा असतो ह्याचा आपण विचारही केलेला नसतो.
अंकांची बेरीज करता करता आपण अनेकांशी कळत न कळत बेरजेच्या रुपात कधी जोडले जातो हेच कळत नाही. हां अर्थात बेरजेच्या रुपात रहायचे की वजाबाकी व्हायचे हे आपल्यावर आहे म्हणा.
शाळेत गुणाकार, भागाकार करताना ती सूत्रे शिकताना खूप कंटाळा यायचा, वैताग येई नुसता, पण आज लक्ष्यात येते आपले सारे आयुष्य सूत्रांवर तर आधारलेले आहे.
आई म्हणायची माणसाचे पाढे कसे तोंडपाठ पाहिजेत, गणितात पैकीच्या पैकीच पाहिजेत. तेव्हा नाही पण आता पटते एकदा काही गणित चुकले की आयुष्याचे सारे गणित चुकत जाते. मग बेरजेची कधी वजाबाकी होती तेच कळत नाही आणि गुणाकाराचा भागाकार व्हायला ही वेळ लागत नाही.
आपल्या आयुष्याचे गणित कसे पाहिजे तर आपल्याला दुसर्यांच्या आनंदाचा गुणाकार करता आला पाहिजे तर दुःखाचा भागाकार. नात्यांची बेरीज करता आली पाहिजे तर त्यांच्या अडचणींची वजाबाकी करता आली पाहिजे.
शेवटी आयुष्य हा एक गणिताचाच तर खेळ आहे. जो मांडायचाही आपणच आणि खेळायचाही आपणच आहे. आपल्यालाच तर ठरवायचे आहे की कशाची बेरीज करायची आणि कशाची वजाबाकी.
ज्याला हे जमले त्याला आयुष्याचे गणित उत्तम जमले नाही का??
सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️6.8.2020
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈