सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ हॅप्पी स्पून डे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नमस्कार मंडळी…जागतिक चमचा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… ‘सेम टू यू‘ तरी म्हणा.. निदान अंगठा तरी….. काय? तुम्हाला‘ चमचा दिन‘ माहितीच नाहीये? आत्ताच “स्वयंपाक दिन” नाही का साजरा झाला व्हॉटस् अप वर?  ..म्हणजे माहिती असणारच… तरीही चमचा दिनाबद्दल नाही माहिती? आश्चर्य आहे. बरं ऐका …. हल्ली चमच्याशिवाय कुणाचेच पानही हलत नाही… बरोबर? विदेशी पदार्थ तर चमच्याशिवाय खाताच येत नाहीत अनेकदा. मग त्यांचे अनुकरण केलेच पाहिजे. म्हणून हल्ली घरोघरी “प्लेट-बाऊल-ग्लास” या जेवणाच्या सरंजामामध्ये चमचाही असतोच असतो. का काय?

आवडत्या आमटीची वाटीच उचलून तोंडाला लावणं आता अशिष्ट समजलं जातं. अळूच फतफत सगळ्या बोटांनी गोळा करून तोंडात घालून सूर्र् ss  आवाज करत तृप्त व्हायचं, बासुंदी-खिरीच्या वाट्याच्या वाट्या मनसोक्त तोंडाला लावत मनमोकळी ढेकर द्यायची, हा तर चक्क गावंढळ पणाच ठरतो हल्ली. त्या ऐवजी बोटांची देखणी हालचाल करत चमचा हळूवारपणे अशा पदार्थांच्या अर्ध्या पाऊण भरलेल्या बाऊलमध्ये बुडवून, एकही थेंब न सांडता ओठाला लावायचा, आणि फूर्र.. बीर्रा असला कुठलाही असभ्य आवाज न करता जिभेवर रिकामा करायचा… तोपर्यंत तो पदार्थ गार होऊन जातो, चव कळत नाही, असले वायफळ आरोप अजिबात करायचे नाहीत. शेवटी sophisticated दिसणं महत्वाचं.

याचं बाळकडू आताशा लहानपणापासूनच पाजलं जातं. बाळाला बाटलीतून दूध पाजणे आरोग्याला घातक असल्याने ते चमच्याने पाजावे असा विचार पुन्हा प्रचलित झाला आहे. त्यामुळे तान्हेपणा पासूनच बाळाची चमच्याशी ओळख होते. पुढे त्याला  “आत्मनिर्भर” करण्याच्या उदात्त हेतूने, “हायचेअर” वर बसवून, समोर पोळीचे तुकडे व भाजी ठेवली जाते. बाळ एक तुकडा महत्प्रयासाने चमच्यातउचलते. मग तो भाजीत टेकवून पुन्हा उचलण्याचे कष्ट करण्यापेक्षा ते हुशार पिढीतले मूल, फक्त पोळीचा तुकडा तोंडामध्ये कोंबून, मग चमच्यात भाजी घेतल्यासारखे करून तो तोंडाला लावतो. हीच — “आत्मनिर्भरता”. इथे पोटात भाजी किती जाते हा मुद्दा गौण ठरतो. पण चमच्याने जेवण्याच हे नाटक मुलं इतकं लांबवतात की शेवटी मम्मी वैतागून त्याला हाताने भरवून टाकते, हे इथे महत्वाचे नाही.

तर अशा रीतीने “चमचा” आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच महत्वाची  भूमिका बजावायला लागतो. आणि हे महत्त्व लक्षात घेऊनच त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा “चमचा डे” साजरा केला जातो…. बरोब्बर…. Mother‘s डे, father‘s डे कसे वर्षातून एकदा साजरे केले की इतिकर्तव्यता होते.. तसंच. पण एक फरक आहे. मदर-फादर प्रत्येकाला एकेकच असतात. पण चमचे?…. प्रत्येक घरात इतके वेगवेगळ्या प्रकारांचे, आकारांचे आणि उपयोगाचे चमचे असतात की,  “माझ्याकडे सगळे मिळून इतके चमचे आहेत”, असं कमालीची गृहकृत्यदक्ष स्त्रीही १००% खात्रीने सांगू शकणार नाही हे मी खात्रीने सांगू शकते.

याशिवाय घराबाहेरही कित्ती चमचे असतात. शेजारच्या दारापासूनच त्यांची जी रांग सुरू होते, ती थेट फक्त दिल्लीपर्यंतच नाही, तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यांचं काम इतकं वैशिष्ट्यपूर्ण असतं की ” चमचेगिरी” हा शब्द त्यांच्यासाठी पुरेसा नसतो. विशेष म्हणजे हे चमचे अदृश्य असतात. त्यांचे रंग-रूप- आकार आणि कामाचा आवाका, अगदी मुरब्बी मातब्बरांनाही समजू शकत नाही. तरीही सगळ्याच प्रकारच्या कार्यक्षेत्रात ते सतत वापरले जातात. अहो घरातले चमचे एकवेळ चिकाटीने नेमके मोजता येतील, पण हे घराच्या बाहेरचे चमचे?….ते चमचे आहेत हेच मुळात कितीदा समजत नाही, मग मोजणं तर लांबच… म्हणजे बघा, चमचा कुठल्याही प्रकारचा असला , तरी त्याचं काम कुणासाठी तरी गरजेचं आणि महत्वाचं असतंचना? मग त्याच्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करणं हा औपचारिक रिवाज पाळायला हवाच …. पटतंय ना? मग म्हणा तर ….”जागतिक चमचा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ” …….

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

मस्त लेख. “चमचा दिन” सााजरा करण्याची कल्पनाच अफाट अााहे.