☆ विविधा ☆ आटपाट नगर…. साठा उत्तरांची कहाणी….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

आपल्या बहुधा सगळ्या कहाण्यात…श्रावणातल्या जवळ जवळ सगळ्या वारांची, त्याचबरोबर मार्गशीर्ष, सत्यनारायण…सत्यविनायक…कोणत्याही कहाणीची सुरुवात…  एक आटपाट नगर होतं, अशी असते.

हे कोणतं आटपाट नगर… कुठे असते ते..?  याचा अर्थ  असा आहे की त्या ज्या कहाण्या आहेत त्या कोणत्याही शहरात घडू शकतील अशा आहेत. आपण त्या कहाण्यांना  ‘भौगोलिक दृष्ट्या न्यूट्रल’ कहाण्या म्हणू शकतो.  त्यामुळेच त्या नगराला  विशिष्ट नाव असायची  गरज नाही. अमुक तमुक नगर होतं असं म्हणण्याऐवजी आटपाट नगर… त्याचा अजून एक अर्थ  सांगता येतो तो म्हणजे आटापासून पाटापर्यन्त म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत…

या कहाण्यांमध्ये असलेल्या त्या नगरात तळी असतात,  त्यावरून शंकर पार्वती जातात,  शेते असतात… हे सगळीकडेच असते… म्हणूनच ते नगर म्हणजे आटपाट नगर.. समजा नारळी पौर्णिमेच्या समुद्र पूजेची कहाणी असेल तर ती आटपाट नगराची कहाणी असणार नाही तर त्या कहाणीत त्या नगराचे विशिष्ट नाव असेल.

आता आपल्याला वाटेल…  आटपाट गाव का नाही?  यातल्या ब-याच कहाण्यांमध्ये राजा राणी असतात,  प्रतिष्ठित  व्यापारी असतात… ज्यांच्या घरी व्रतवैकल्ये केली जाऊ शकतात अशी संपन्न घरे असतात… त्यामुळे  ती ठिकाणे म्हणजे छोटी गावे नसून सधन नगरे असतात.

या सर्व कहाण्यांचा शेवट ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा असतो.

अनेक ठिकाणी याचा अर्थ…’ही साठ उता-यांची कहाणी पाच उता-यात सारांशाने सांगितली आहे आणि ही कहाणी ऐकून आता व्रताची सांगता होईल आणि व्रताचे सुफळ मिळेल असे सांगितले आहे.

पण मला असं वाटतं… माणसे काहीतरी इच्छा धरून ही व्रतवैकल्ये करतात.

या इच्छा म्हणजे… घरातले लग्न,  नोकरी,  परीक्षेत यश, स्वतःचे घर,  आरोग्य, नावडतीचे आवडते होणे,  मोटार गाडी, ध्येयपूर्ती …परदेश प्रवास… या प्रकारच्या असतात.   आपण जर काळजीपूर्वक या इच्छांची मोजदाद केली तर या सर्व इच्छांची संख्या साठ पेक्षा जास्त नसते… अगदी माणसांचे सरासरी आयुर्मान साठ वर्षांचे धरले आणि इच्छा मनात निर्माण  होण्याच्या वयाचा विचार केला तर आपल्यालाही हे पटेल… त्यामुळे ही साठ उत्तरांची कहाणी… पाचा उत्तरी संपूर्ण  होते… म्हणजे काय… तर त्याची फलश्रुती ही पाच ज्ञानेंद्रियांना किंवा पाच कर्मेंद्रियांना सुखावणारी असते.  खरं तर आपल्या संस्कृतीत ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांपेक्षा अधिक महत्व आहे…

त्यामुळे  ते व्रत त्यात सांगितलेल्या नियमाने पूर्ण झाले  असले तरी प्रत्यक्षात त्याचे सुफळ  मिळाल्यावरच ते संपूर्ण  होणार आहे असा गर्भित संदेश…ज्याचे किंवा जिचे व्रत केले आहे त्या देवतेला ..ज्याने किंवा जिने व्रत केलेले आहे त्यांनी  दिलेला असतो.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

रंजक,माहितीपूर्ण लेख.