श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

पंडित! कवितेचे रसग्रहण थोडक्यात पण छाान केले अाहे.रसग्रहण करताना सावरकर अाणि गदिमांच्या कविताही अापणास अााठवल्या अाणि अापण त्यांचा संदर्भही दिलाात. अापले रसग्रहण मनास भाावले.

P P Joshi

पंडीत ! खूप सुंदर रसग्रहण केलं आहे , तुमच्या कविता सुद्धा खूपच सुंदर असतात . तुमच्या नवीन कवितेची नेहमीच प्रतीक्षा असते.