श्रीमती अनुराधा फाटक
☆ विविधा ☆ चूल….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
जिच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो ती जागा म्हणजे चूल.चूल ही सामान्यतः स्वयंपाकघरात असते.तिच्यावर कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो म्हणून चुलीला देवत्व प्राप्त झाले आहे त्यासाठीच चुलीला पाय लावीत नाहीत.पूर्वी चूल सारवून तिच्यावर रांगोळी घातली जात असे.अग्नीकुंडाचे एक स्वरुप म्हणून चूल ओळखली जाते.
चूल हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा टप्पा दाखवते.प्रारंभी माणसे विस्तवात अन्न भाजून खात असत.त्यानंतर तीन दगडांची चूल आली.बलुतेदारीची पध्दत अस्तित्वात आल्यावर कुंभार मातीच्या चुली बनवू लागले.नंतर लोखंडाची,लोखंडी बादलीतील चूल आली.फिरस्तीचे लोक हलविता येणारी ती चूल वापरू लागले.आता गॅसच्या शेगड्या सर्वत् वापरात असून विद्युत चूल आणि त्या पाठोपाठ सौर चूल आली.
कितीही गरीबी असली तरी चूल अडवता येत नाही .काही ना काही शिजवावेच लागते.कधी कधी मात्र चुलीला वाटाण्याच्या अक्षदाही द्याव्या लागतात
म्हणजे उपाशी रहावे लागते.याला चुलीला विरजण पडणे असेही म्हणतात.अत्यंत दारिद्र्यावस्था येण्याला चुलीत मांजरे व्यालेली अवस्थाही म्हटले जाते.दारिद्र्यात भर पडणे म्हणजे चूलजाळ आणि पोटजाळ एक होणे !
काही वेळा माणसाची बुध्दी नको ते काम करते त्यामुळे नुकसान होते अशावेळी तुझी अक्कल चुलीत गेली होती कां?असे विचारले जाते.
चूल आणि स्त्री यांचे नाते अतूट असल्याने बऱ्याचवेळा स्त्रिया आपले विचार चुलीत सारतात म्हणजे गप्प बसतात, चुलीत डोके खुपसून स्वयंपाक करतात.
आता मात्र स्त्री बाहेर पडल्याने चुलीत डोके खुपसण्याइतकेच तिचे जगणे मर्यादित राहिले नाही.
जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत चूलीचे अस्तित्व असणार आहे.
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈