प्रा.सौ. सुमती पवार
☆ विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार’☆
चला मंडळी मी तुम्हाला आता माझ्या माहेरीच घेऊन जाते, नवरात्राच्या … पुजे साठी…! हो पण मी आता ९/१० वर्षांची मुलगी आहे बरं का .. तुम्ही ही थोडे लहान व्हाच माझ्या बरोबर ..म्हणजे कशी मजा येईल नाही का..?
तेंव्हा फारसे कळत नव्हते याचे आता वाईट वाटते .. आई राबायची . काही काम सांगायची नाही. दसरा यायच्या आधी १५ दिवस तिची लगबग सुरू व्हायची.
आता ते लहानपणी पाहिलेले सारे.. डोळ्यांसमोर लख्ख दिसते मला . हो .. खेड्यातले घर .. मातीच्या भिंती, चूल नवरात्र सुरू होतांना घट बसवायच्या आधी सारी साफसफाई झाली पाहिजे . रोजच्या कामांचा धबडगा त्यात घराला पोतेरे करणे, चुनखडीची पांढरी माती आणवून पूर्ण घर ती लख्ख करायची, सर्व घर शेणाने सारवून घ्यायची, नि मग बाकीची तयारी सुरू व्हायची .
गहू ओले करणे. हो सांजोऱ्या पुऱ्यांचा नैवेद्य लागतो ना ? मग गहू ओलणे, ते बांधून ठेवणे ते स्वत: जात्यावर दळणे, त्याची रवा पिठी वेगळी करणे … ही…..कामांची झुंबड उडायची विचारू नका .. म्हणून आता आठवले की, डोळे भरून येतात .. काहीच का उपयोगी पडलो नाही आपण आईच्या ? का तिने कामाला लावले नाही मला …? ह्या आया असतातच अशा …स्वःताच झिजतात …
मग दारावर कुंभारीण डोक्यावर मडक्यांचा मोठा हारा घेऊन यायची . हो तेव्हा गावचे १२ बलुतेदार गावची सेवा करायचे नि दाम रोख न मागता सुगीत खळ्यावर येऊन धान्याच्या रूपात मोबदला न्यायचे . कुंभारीण दारात ऐसपैस बसायची नि आई तिच्या पसंतीची मडकी निवडून घ्यायची घटा साठी ! एक मोठे व दोन छोटी .. त्याला लोटा म्हणायचे आमच्याकडे खानदेशात .. तरी आई तिला भाजी भाकरी, गहू बाजरी द्यायची . कुंभारीण खूष होऊन जायची . मी तिथेच आई जवळ 11लुडबुड करत असायची . मग आई त्या कोऱ्या मडक्याला धुण्यासाठी त्यात पाणी ओतायची नि मस्त खरपूस वास सुटून हलकीशी वाफ त्यातून निघत सुर सुर असा आवाज येत ते मडके पाणी शोषून घ्यायचे कारण ते भट्टीतून भाजून काढलेले असायचे ना ?
मग प्रथमेला एका विशिष्ट जागी जिथे फारशी वर्दळ नाही अशा खोलीत देव्हारा लख्ख करून त्याच्या समोर जमिनीवर गहू बाजरी गोल अंथरून पाण्याने भरलेला घट त्याच्यावर बसे व त्याच्यावर तो छोटा घट -ठेवला जाऊन दोन्ही घटांना फुलमाळा लटकत .
अहो त्या काळी ६० वर्षांपूर्वी फुले कसली खेड्यात …? तर शेतात असणाऱ्या रुई च्या झाडांची फुले सालदार गडी शेतातून येतांना घेऊन यायचा नि त्यांची माळ बनायची ..ती माळ दोरीने वर पर्यंत टांगलेली असायची . आणि हो .. एक मोठा पावशेर तेल मावेल असा दगडाचा खोल दिवा ती घासून पुसून ठेवायची निमोऽऽऽऽठी वात करून त्यात भरपूर तेल ओतून पेटवायची ..किती प्रसन्न नि छान वातावरण निर्माण व्हायचे ! घरोघर घट बसायचे . त्याच चर्चा व्हायच्या .. आई रात्री १० दिवस घटा जवळच गोधडी टाकून झोपायची .. हो, दिवा १० दिवस अखंड तेवत ठेवायचा ना … ! म्हणून रात्रीतून चार वेळा उठायची .. वात सारखी करायला … हे सारे आठवले म्हणजे त्यांच्या निष्ठेचे कौतुक वाटते.
१० व्या दिवशी काय मज्जा ! किती पदार्थ बनवायची .. आताही मला जाळीदार स्टॅण्डला तो टांगलेला फराळ दिसतो आहे .. टम्म सांजोऱ्या . गरगरीत पुऱ्या .. अहा बघूनच मन तृप्त होत असे .. मी तेव्हा किती काय खाल्ले आठवत नाही पण तो टांगलेला फराळ कायमचा स्मृतीत दडलेला आहे …. तो नजरे समोरून हटत नाही ..देव्हाऱ्याजवळ मुटकुळ करून झोपलेली आई दिसते … आणि हो या दहा दिवसात घटा खालच्या गहू बाजरीला भरगच्च हिरवेगार धान जवळपास ९/१० इंचापर्यंत वाढून सुंदर दिसायचे …! रोज फुलमाळा बदलल्या जायच्या… पवित्र नि मंगल वातावरणाने घर भरून जायचे …!
आता मी नवरात्रीचा विचार करता … असे वाटते की …काळानुसार स्वरूप बदलले आहे .. उत्साह मात्र प्रचंड आहे ..घराघरातूनअंगणातून गर्बा आता खुल्या मैदानात आला आहे.. तरूणाई थिरकते आहे, आनंद लुटते आहे . अबालवृद्ध मोठ्या चवीने गरबा बघतात आनंद लुटतात .. रस्तो रस्ती चैतन्य सळसळतांना दिसते ..नवरात्र ते दिवाळी आनंदाला नुसते उधाण येते ..
नवरात्रात घरोघरी बसलेल्या घटा खाली उमललेले हिरवे धान हे…. हे देवीच्या ……. सृजनशीलतेचे प्रतिक आहे ..घरोघर तिची पूजा अर्चा होते, गणेश चतुर्थी पासून सुरू झालेल्या सणांची दिवाळी नंतर सांगता होऊन हे उत्साहाचे पर्व समाप्त होते … ते हिवाळ्याच्या दुलईत गुडूप होऊन शांत होते…
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि . २३/०९/२०२० वेळ : रात्री ११:२५
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈