श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्री सद्गुरुंनी माझ्याकडून लिहवून घेतलेल्या “चिंतामणी चारोळी व श्रीचामुण्डेश्वरी चरणावली या संग्रहाचे पूजन व प्रकाशन अष्टविनायक चिंचवड मंडळाचे प्रमुख विश्वस्त मा.श्रीआनंद महाराज तांबे यांचे हस्ते दिनांक ३०-१२-१९ सोमवार विनायकी चतुर्थी या दिवशी क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी मंदीर प्रांगणात संपन्न झाले.
त्यातील चामुण्डेश्वरी चरणावली संग्रहातील चारोळी मी शारदीय नवरात्रात रोज सादर करण्याची माझी इच्छा आहे व हे सद्भाग्य मला सद्गुरु कृपेने लाभते आहे यासाठी मी आपल्या सर्व बंधूभगिनींची कृतज्ञ आहे.
– साधक उर्मिला इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 1???
आलं आलं नवरात्र
ऋतू शरदाचा काल
देवपूजा आराधना
उपासना तिन्ही काल!!
आलं आलं नवरात्र
सजवूया घर छान
देवी येणार पाहुण्या
त्यांचा करु मानपान !!
आलं आलं नवरात्र
कुलाचार घरोघरी
यथाशक्ती यथामती
होई पूजा घरोघरी !!
नवरात्र परंपरा
व्हावे रक्षण कुलाचे
कृपाछत्र घरावरी
सदा रहावे देवीचे !!
नवरात्री फलप्राप्ती
वंशवृद्धी होत असे
व्हावे कल्याण विश्र्वाचे
प्रार्थनेत ध्येय वसे!!
नवरात्र पर्वकाळ
प्रतिपदा ते नवमी
दिन दहावा दसरा
देई मांगल्याची हमी !!
प्रतिपदा ते सप्तमी
सप्तरात्री व्रत असे
नवरात्री चार अंगे
घटस्थापना ती असे!!
शेतातील काळी माती
सफ्तधान्ये पेरावीत
हळदीने रंगवावी
सप्तधान्ये ती पाण्यात!!
मोठी समई धातूची
जोडवात ती तेलात
कापसाची वीतभर
नवरात्री लावतात!!
नवरात्री कुलाचार
हरदिनी कृपाछत्र
होम हवनाचा थाट
घरोघरी हो सर्वत्र !!
देवीपुढे तेलदिवा
नवरात्री तेवतसे
नंदादीप हा अखंड
देवी कृपा करीतसे !!
!! श्रीजगदंबार्पणमस्तु!!
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈