☆ विविधा ☆ भूलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

भूलाबाई हे पार्वतीचे भिल्ल म्हणजे आदिवासी स्त्री चे रुप.  आपण अनेक कथांमध्ये पार्वतीने शंकरासाठी केलेले तप ऐकले आहे पण इथे शंकराच्या रुपातले भूलोजी राणे पार्वतीचा अनुनय करताना दिसतात. त्यांची  पार्वती राणी रुसून बसते मग ते शंकर तिला स्वतः न्यायला जातात.  तिला झोपण्यासाठी सोन्याचा पलंग आणि मोत्याची मच्छरदाणी असते. तिच्या डोहाळ्यासाठी नाना रंगाच्या भरजरी चोळ्या शिवून त्यावर अत्तरे शिंपलेली असतात.  डोहाळे पुरवण्यासाठी सासू, सासरे, दिर जावा आणि नणंदा धावपळ करत असतात. एवढ्याने काय होणार म्हणून रुसलेल्या पार्वतीकडे शंकर महादेवाची रदबदली करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून दस्तुर खुद्द खंडोबा, भैरोबा, सूर्य, चंद्र, बृहस्पती असे देव येतात सर्वात शेवटी गणेश आणि कार्तिकेय ही बाळे आल्यावर ती आपला रुसवा एकदाचा सोडते.

हे सगळं त्या भूलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.  या काळात ती शंकरदेवांवर पण यथेच्छ तोंडसुख घेते.. त्याने घडवलेला दागिना कसा धड नाही,  त्याने आणलेले लुगडे कसे पोतेरे, फूले वेचून आणली तीही शिळी आणि बिनवासाची.. त्याला संसाराची कशी आच नाही… सतत डमरू वाजवणे किंवा गणांबरोबर नाचणे आणि तप करणे,  याशिवाय त्याला कसे काहीच येत नाही… अशा प्रकारची वैताग व्यक्त करणारीही काही गाणी आहेत.

शेवटी बिचारा शंकर विष्णू देवांकडून प्रपंचाची कौशल्ये शिकतो तेव्हा कुठे ही भूलाबाई त्याच्याबरोबर जायला तयार होते. भूलाबाई स्वयंप्रज्ञ आहे,  तिला काय हवे ते तिला स्पष्टपणे सांगता येते.  ती अन्याय सहन करत नाही. प्रसंगी वांड नव-याला धडा शिकविण्यासाठी माहेरी किंवा माहेरी भावजया बोलल्या तर सख्यांबरोबर किंवा थोडे दिवस एकटीने फिरून यायचीही तिची तयारी आहे.

मुलींना आत्मसन्मानाची कल्पना यावी आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी निर्भिडपणे वागावे यासाठीच कदाचित पहिली मुलगी असेल त्या घरी प्रामुख्याने भूलाबाई  बसवली जाते.  काही जणांकडे भूलाबाई घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त बसवतात. तर काही जणांकडे भाद्रपद ते शरद पौर्णिमा अशी महिनाभर भूलाबाई बसलेली असते. भूलाबाई म्हणजे खरे तर ‘शंकर पार्वतीची मूर्ती’ घराच्या दर्शनी भागातल्या कोनाड्यात बसवतात.  या काळात रोज तिला संध्याकाळी हळदी कुंकू आणि अक्षत लावून पूजा करतात.  त्यावेळी  बहुधा त्या दिवसात मिळणाऱ्या किंवा गुलबक्षी, चमेली किंवा जाईच्या फूलांचे बारीक मोरपंखीच्या पानांसकट बनवलेल्या माळा रोज पूजेच्या वेळी घालतात. या माळांमध्ये फूले,  पाने आणि बिया गुंफाव्याच लागतात. गोंड या आदिवासी जमातीत मात्र सगळ्या गावातल्या मुलींची एकच भूलाबाई बसवतात आणि रोज सगळ्याजणी  तिच्यासाठी रानफूलांच्या माळा घेऊन येतात.  त्यांची भूलाबाई म्हणजे मातीची पार्वतीची मूर्ती असते.

भुलाबाईच्या काळात मुली घरोघरी जाऊन टाळ्या वाजवून गाणी म्हणतात. खिरापतही चढती असते म्हणजे पहिल्या दिवशी एक,  दुसर्‍या दिवशी दोन अशा प्रकारच्या..आणि अर्थातच ओळखायच्याही असतात.

शेवटच्या म्हणजे बोळवणाच्या दिवशी मात्र तीस आणि तीन अशा खिरापती करायची पध्दत आहे.  एवढ्या खिरापती एकट्याने करण्याच्या ऐवजी सर्व मुली मिळूनही त्या भुलाबाईची सांगता करतात. जिच्या घरी भूलाबाई बसवतात तिला पांढरे किंवा निळे कपडे घेतात आणि मोत्याचा एखादा दागिनाही करतात.  खिरापतीमध्येही पांढ-या पदार्थांचे  प्राबल्य अधिक असते.

भूलाबाई देवी असली तरी तिला मानवी स्त्री च्या भावभावना आहेत. तिला नव-याचा राग येतो,  माहेरच्या अगदी शेणगोठ्यावरही तिचे प्रेम असते, तिच्या सख्या,  तिची मुले,  भाऊ बहिणी,  आई वडील…सासर माहेर हेच तिचे विश्व… पण त्यातही तिला तिचे स्वतःचे स्थान असले पाहिजे ही जाणीव आहे.. त्यामुळेच भूलाबाई  आपल्याला जवळची वाटते आणि खरं सांगायचं तर ईश्वराचे हे स्त्री- रूप फारच विलोभनीय आहे…

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

भुलाबाई: खूप नवीन माहिती मिळाली.रंजक परंपरा.