श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 68 ☆
☆ माझ्या सोबत ☆
स्वतःशीच मी बोलत असता, तीही असते माझ्या सोबत
तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत
तिच्या स्मृतीला चौकट नाही, भिंती नाही, नाही खोली
सुक्ष्म मनाच्या गाभाऱ्यातुन, येउन माझी भूमि व्यापली
मनी उतरते व्यापुन घेते, उगाच नाही खोटे बोलत
तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…
सारीपाट हा तिच्या स्मृतिचा, कसा आवरू खेळ प्रीतिचा
बंदिवान या चौकटीत मी, खेळ चालला अटीतटीचा
खेळामधली कवडी झालो, नाही दुसरा रस्ता शोधत
तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…
क्षणा क्षणाला तिचीच सोबत, सुख शांतीही असते कायम
मंत्राची या जादू मोठी, ठायी ठायी दिसतो सोहम संसाराची अवीट गोडी, जीवन लाभो असेच अविरत
तिला टाळणे शक्यच नाही, हेच मनाला असतो सांगत…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈