सौ. अमृता देशपांडे
☆ कवितेचा उत्सव ☆ राहिले रे दूर घर माझे ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
तिचं मन अतिशय हळवं,
फक्त तिचंच?..
त्यांचं ही तितकंच हळवं,
किंबहुना जरा जास्तच..
नोकरीसाठी घर सोडून जाताना
त्यांचं ही मन रडतं
घरापासून त्यालाही दूर
रहावं लागतं .
घरच्या आठवणींनी मन त्याचंही
कासावीस होतं,
जाऊ घरी लवकरंच….आपलीच
आपण समजूत काढतं.
घरचे सणवार,पारंपरिक जेवण
त्यालाही चुकतं,
मन मोकळं करण्या पूर्वीच
दोन टिपं गाळतं….
मी मस्त मजेत आहे घरी फोनवर
तो सांगतो,
घरच्या सगळ्यांना आनंदात ठेव
म्हणून देवाकडे मागतो.
कधी कधी आठवणींनी काळीज
त्यांचं पिळवटतं,
आणि उशीमध्ये तोंड खुपसून
ढसढसा रडतं…
पुरूषमाणूस बाबा तू रडणं
तुला शोभत नाही,
शब्द घुमतात कानात,
पण मन मात्र ऐकत नाही…
जड मनाचं ओझं आज काही केल्या पेलवत नाही,
आसवं सुद्धा आज ऐकायला तयार नाहीत..
हुंदक्यांची लाट उशी भिजवून
टाकते,
घरच्या आठवणींनी मन आणखीच जड होते.
अनावर मन तुला आर्त साद
घालते,
” आई, ए आई, तुझी खूप
आठवण येते
तुझी खूप आठवण येते. ”
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈