☆ विविधा ☆ कृष्णसखा ☆ सुश्री मनिषा कुलकर्णी ☆
भगवंता, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझी पूजा करतो, भक्ती करतो. आमच्या मनासारखे झाले की आम्ही खूष. आयुष्यात सगळे मनासारखं व्हावं वाटते पण थोडे मनाविरुद्ध झाले की तुला दूषण देतो. खूप खूप राग येतो रे तुझा अगदी तुझे नाव सुद्धा घायचे नाही असे ठरवितो पण आज शांत पणे विचार केला का रागावतो आपण त्याच्यावर, माणूस म्हणून जन्माला तर तुला कुठे सुख मिळाले, काय सहन केले नाहीस तू.
अगदी जन्म झाल्यावर मातृसुखाला पारखा झालास, आईचे दूध पण मिळाले नाही. काय झाले असेल त्या माऊलीचे व बाळाचे. नंद यशोदेने लाडाने वाढविले, कोडकौतुक केले पण एक दिवस ते सर्व सोडून निघून गेलास. बालपणीचे मित्रांना सोडलेस. पेंद्या, सुदामाला सोडताना तुलाही वेदना झाल्या असतील ना रे?
पण कुठे गाजावाजा नाही, सहज गेलास. तुलाही भावना अनावर झाल्या असतील ना रे?
राधेवर प्रेम केलेस, खरी सखी ती. तिला पण सोडलेस. बासरी ही परत नाही वाजविलीस. गोपिकांबरोबर तिलाही सोडलेस. रुक्मिणीशी विवाह केलास. तुला राधेची आठवण येत असेल ना रे? सारे सारे मुकाट्यानं सहन केलेस.
अर्जुनाचा सारथी झालास. आम्हा माणसांना किती कमीपणा वाटला असताना असे काम करताना, आमचा अहं दुखावला असता पण तू सहज स्वीकारलेस. कसे केलेस रे हे तू पण माणूस होतास ना?
मग आम्हाला थोडे जरी दुःख झाले की आम्ही तुला दोष देतो जणू तुला दुःखच नाही झाले सारे आम्हीच भोगतोय. तरी तू आमच्यावर कधी ही रागावत नाही
द्रौपदीच्या बंधुप्रेमाला जगलास, मीरेच्या भक्तीला धावलास, गोपिकांना विवाह करून न्याय दिलास, सुदाम्याच्या मैत्रीला गळाभेट दिलीस. श्रीमंतीचा बडेजाव नाही, गरिबीचा तिरस्कार नाही नाहीतर आम्ही माणसे चार पैश्याच्या घमेंडीत सारे काही विसरतो, सत्तेमुळे झापड येते, मदमस्त होतो थोडया यशाने. यात मात्र थोडे कमी जास्त की तुला दोष.
आम्हाला तुझा जीवनपट आठवत नाही, तुला झालेल्या वेदनांचा आम्हाला विसर पडतो.
“सुख दुःखी सम सदैव राही तोल मनाचा ढळू न देई स्थितप्रज्ञ श्याम”
राम काय श्याम काय, माणूस म्हणून जन्माला आले, सामान्य माणसासारखे भोग भोगले ते ही काही तक्रार न करता.
कृष्णा, आम्हाला माफ कर, आम्ही तुला ओळखलेच नाही रे. अन आम्ही भक्त म्हणवितो तुझे तिथे ही आम्ही स्वार्थी. भक्ती ही निस्वार्थी करत नाही.
© सुश्री मनिषा कुलकर्णी
पुणे
भ्रमणध्वनी:-8999058771
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈