श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतेचे मंदिर स्थापनेपासून व त्यानंतरचे पेशवेकालीन वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये गुंफलं आहे.
रुणुझुणुत्या पाखरा
या चालीवर म्हणून पहाव्यात खूप छान वाटतात.
– साधक उर्मिला इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -६
!!श्रीराम समर्थ!!
जोगेश्वरी तांबडी ती
ग्रामदेवता पुण्याची
ग्राम संरक्षक देवी
वर्षे तीनशें पूर्वीची !!
आहे उल्लेख पुराणीं
नाम तिचे योगेश्वरी
रुप प्राकृत तियेचे
शोभे नाम जोगेश्वरी !!
वध ताम्रासुराचा तो
पराक्रम करणारी
चतुर्भुजा स्वयंभू ती
नवसाला पावणारी !!
हाती डमरु त्रिशूळ
पानपात्र नि मुंडके
ताम्रासुरास वधून
रुप आगळे झळके !!
मूर्ती रहस्य आख्यान
जीव शिव एकरुप
पुण्यामध्ये स्थिरावले
जोगेश्वरी निजरुप !!
दिले खाजगीवाल्यांनी
बांधुनिया देवालय
जिवाजीने दिली जागा
उभे राहिले आलंय !!
झाले प्रसिद्ध मंदिर
येता पेशवे पुण्याला
भट श्रीवर्धनकर
आले पुण्य उदयाला !!
होते दुर्मिळ दर्शन
दूर होती योगेश्वरी
पुण्यामध्ये विसावली
जगन्माता जोगेश्वरी !!
लग्न मुंजीच्या अक्षता
येती वाजत गाजत
जोगेश्वरी आशीर्वाद
करी लक्षुमी स्वागत !!
रमा सगुणा पार्वती
पेशव्यांचा राणीवसा
राधा आनंदी जानकी
जोगेश्वरी वाणवसा !!
दिली अक्षत देवीस
लग्न द्विबाजीरावांचे
अमृत नी विनायक
व्रतबंध पेशव्यांचे !!
माधवराव पेशवे ते
जातायेता मोहीमेस
जोगेश्वरी देवालयी
येत होते दर्शनास !!
जोगेश्वरी पालखीत
सणावारी मिरविते
पेठेपेठेतुनी माता
मुख दर्शन दाविते !!
नवरात्री जोगेश्वरी
जाई तुळजापुरास
पेशव्यांचा लवाजमा
भवानीच्या दर्शनास !!
क्रमश:. ….
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा