श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ आमचे दादा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आमचे दादा असं मी वर म्हंटलं खरं, पण ते आता आमचे राहिले नाहीत. ते आता देवाचे झालेत.
२६ ऑक्टोबरला त्यांना जाऊन वर्ष झालं. त्या निमित्ताने त्याचं स्मरणरंजन असंही मी म्हणणार नाही, कारण त्यांची आठवण तर आम्हाला रोज येते. दादा म्हणजे माझे मोठे दीर. गंगाधर नारायण केळकर. माधवनागर कॉटन मिल्सचे मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी काम पाहिले. शिस्त आणि सहानुभूती या दुहेरी विणीवर आधारलेलं त्यांचं व्यवस्थापन अतिशय यशस्वी झालेलं होतं. कामगार, ऑफीसमधील कर्मचारी वर्ग आणि मालक मंडळी यांच्यातील ते दुवा होते. हा दुवा अतिशय नाजूक होता. या पदावरून काम करताना, कुठलाही निर्णय घेताना, कुणावरही अन्याय होत नाही ना, हे बघणे अतिशय महत्वाचे असते. ते कौशल्य त्यांना चांगल्या रीतीने साध्य झाले होते.
माझं लग्न होऊन मी केळकरांच्या घरात आले. सगळे जण दादा म्हणत, म्हणून मीही भाऊजींना दादा आणि मोठ्या जाऊबाईंना वाहिनी म्हणू लागले. पण पुढे दादा हे केवळ म्हणण्यापुरते राहिले नाहीत. ‘दादा’पणाचं नातंचं मनात, वर्तनात घट्ट रूजलं. मला मोठा भाऊ नाही. मोठ्या भावाचं प्रेम, माया, काळजी, मार्गदर्शन सगळं सगळं मला त्यांच्याकडून मिळालं. त्यांना चार बहिणी. एक मोठी. तीन धाकट्या. त्यानंतर मी त्यांची पाचवी धाकटी बहीण झाले. लग्नानंतर एकही दिवाळी अशी गेली नाही, की त्या दिवाळीत मला भाऊबीज मिळाली नाही.
माझं लग्न झालं, तेव्हा जवळची- लांबची अशी तीस –पस्तीस जणं महिनाभर तरी घरात होती. त्यावेळी तिथे असलेल्या माझ्या चुलत मावस सासुबाई, इंदिरा जोशी आणि चुलत आत्ये सासुबाई, ताई सोमण मला म्हणाल्या होत्या, ‘तुझ्या घरात दोन देवमाणसं आहेत बघ. एक तुझ्या सासूबाई आणि दुसरे तुझे दीर दादा. त्या तेव्हा जे म्हणाल्या, ते पुढच्या काळात मी अनुभवलं. ‘जिथे कमी तिथे मी’ हा सासुबाईंचा बाणा. तिथे हजार असणं, हे शरीराने, मनाने, अर्थाने असे सर्वार्थाने असे. गरजावंताला आर्थिक मदत करण्यासाठी दादांचा हात सदाचाच वर उचललेला असे. विंदा करंदीकरांनी कुणापासून काय घावे, हे सांगताना म्हंटले, ‘ एक दिवस घेता घेता देणार्याचे हात घ्यावे.’ दादांच्या बाबतीत मला नेहमीच वाटत आलय, की त्यांचे हात, म्हणजे त्यांचं दातृत्व घ्यायला हवं. कदाचित सरत्या शालेय वर्षात त्यांनी जी विपन्नावस्था अनुभवली, त्याचाही परिणाम असेल की अनेक परिचित, अपरिचित मुलांना शिक्षणासाठी त्यांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक मदत केली.
दादा दहावीत असताना एक मोठेच संकट कुटुंबावर कोसळले. त्यांचे वडील नाना स्वर्गवासी झाले. लहान वयात त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.
११वीचं वर्ष कसबस पार पडलं. त्यांनी शिक्षण सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. १९४४ साली माधवनागर कॉटन मिल्समध्ये क्लार्क म्हणून ते नोकरीला लागले. आपली हुशारी, बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा, सचोटी, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणे, या गुणांच्या बळावर अकाउंटंट आणि नंतर मॅनेजर या पदापर्यंत दादा पोचले. ते पदवीधर नव्हते पण जिद्द आणि कष्टाच्या बळावर त्यांना मॅनेजरची मानाची खुर्ची मिळाली. मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी मिलचे व्यवस्थापन बघितले. १९९४ साली ते सन्मानाने आणि समाधानाने निवृत्त झाले.
मिलचे, तिथल्या लोकांचे अनेक प्रश्न. अनेल समस्या. दादांना अनेक ताण-तणाव असणारच. पण ते, ते सगळं तिथेच ठेवून घरी येत. मनात असतीलही कदाचित. पण त्या विषयी ते घरी काही बोलत नसत. त्याचा त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनावर कधी परिणाम होऊ दिला नाही. दादा निवृत्त होण्यापूर्वी त्याच्या मुलांची, मुलींची लग्ने-कार्ये होऊन ती आपआपल्या संसाराला लागली होती. त्यांच्या प्रापंचिक जाबाबदार्या संपल्या होत्या. २००० साली आमच्या वाहिनीही गेल्या. दादांना काहीसे एकटेपण जाणवले असणारच. पण त्यांनी कधी त्याचा बाऊ केला नाही..
मी नेहमी म्हणायची, आमची ‘गायत्री’ म्हणजे वृद्धाश्रम आहे. इथे सगळे ७५च्या वरचे तरुण राहतात. माझी वाहिनी सौ. अंजली गोखले यावर म्हणाली, तो ‘आनंदाश्रम’ आहे. तो ‘आनंदाश्रम’ होऊ शकला, याचे सर्व श्रेय दादांचे.
दादांचं जीवन सफल, संपूर्ण झालं. यशस्वी जीवन ते जगले. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते आणि पारमार्थिक वृत्ती हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. आम्हाला, मुलं- मुली- नातवंडांना त्यांनी संस्काराची शिदोरी दिली. त्याबाबत आम्ही किती भाग्यवान, पण दादा आम्हाला तुमच्याबद्दल किती कृतज्ञता वाटते, त्याच्याही पलिकडे काय काय वाटतं, हे तुम्हाला
कसं कळेल?
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
शब्दांतून साकारलेले उत्तम व्यक्ती चित्र