☆ कवितेचा उत्सव ☆ सोनसळी झाले रान ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
(अष्टाक्षरी काव्य प्रकार)
फुले रान मदनाचे…
कस्तुरीचा गंध तुझा
कमरेचा बाक छान
हसताच गाली खळी
सोनसळी होते रान………
स्पर्श होता मखमली
करवंदी जाळीतून
ओथंबले दवबिंदु
सोनसळी झाली धून…..
नुपुरांच्या रूणझुणी
कमनीय कटी कळी
नयनात येता धुंदी
रान झाले सोनसळी….
चंद्र किरणांचा सडा
चांदण्यांचे मुक्त गान
अधरात तुझ्या पीता
सोनसळी झाले रान………
तुझ्यातला श्वास माझा
केवड्याचा गंध माळी
मुक्त झाला एक लोंढा
रान झाले सोनसळी…….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈