☆ सूर संगत ☆ सूर संगीत – राग यमन ☆ सुश्री अरुणा मेल्हेरकर ☆
संगीतापासून दूर रहाणारा अपवादात्मकच कोणी असू शकतो,कारण~~
सूर म्हणजे जिव्हाळा
सुख शांतीचा हिंदोळा
सुरांतच असते भक्ति
सूर देतात मनास शक्ति
सा सर्वांचा सोबती
रे कधी विरह कधी शांती
ग ने होतो भावनाविष्कार
म अति कर्ण मधूर
प असते विश्रान्ती
धने येते संगीतसागरास भरती
नि नाजूक कोमलांगी ललना
सप्तसूर देती आल्हादच जीवना
सुरांच्या या प्रकृतीवर हिंदुस्तानी /कर्नाटकी राग संगीत आधारलेले आहे.
सा रे ग म प ध नी ह्या एका सप्तकाच्या २२ श्रुति आहेत. साच्या ४, रेच्या ३, गच्या २, मच्या ४, पच्या ४,धच्या ३, निच्या २. अशा या २२ श्रुति.
हेच सुरांतील नाद होत. ह्या २२ नादांतून शुद्ध व विकृत अशी स्वर निर्मिती शास्रकारांनी केली आणि आजतागायत हे शास्र सर्वमान्य आहे.
अशारीतिने ७ शुद्ध आणि कोमल रे ग ध नि व तीव्र म हे ५ विकृत स्वर, अशा एकूण १२ स्वरांवर संपूर्ण जगतात संगीत विराजमान आहे.
वेदकालापासून संगीत हे शास्र मानलेले आहे. सामवेद हा संगीत विषयावरील वेद आहे. भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्रांत संगीताविषयीचे नियम सांगितले आहेत. २०/२१ व्या शतकांत राग संगीत थोडे थोडे बदलत गेले असले तरी मुख्य पाया अढळच आहे. पं.कुमार गंधर्व, संगीत मार्तंड जसराजजी यांच्यासारख्या कलावंतांनी अनेक नवीन रागांची नीर्मिती केली असली तरी आजही संगीताच्या नवशिक्या विद्यार्थ्यांस यमन,भूप,भैरव काफी हेच पारंपारिक राग प्रथम शिकविले जातात.
या लेखमालेत एका रागाची ओळख करून द्यावयाची आहे म्हणून मी माझा आत्यंतिक आवडीचा प्रारंभिक राग यमनची निवड केली आहे.
यमन हा संपूर्ण राग आहे.म्हणजे या रागांत सा ते नि ह्या सातही स्वरांचा समावेश आहे. यांतील मध्यम(म) मात्र तीव्र आहे. म्हणून हा कल्याण थाटांतील राग.
सा रे ग म (तीव्र)प ध नी सां~आरोह
सां नी ध प म(तीव्र) ग रे सा~अवरोह
नि(मंद्र)रे ग रे सा, प,म(तीव्र) ग, रे, सा~पकड
म्हणजे रागाचे स्वरूप दाखविणारा स्वर समूह.
ग(गंधार),नि(निषाद) अनुक्रमे वादी व संवादी स्वर.
हा राग प्रामुख्याने रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला/वाजविला जातो.
असे म्हणतात की हा राग चांगला घोटला गेल्यानंतर बाकीचे इतर राग शिकणे सोपे जाते.
येरी आली पियाबिन, तोरी रे बासुरिया, मोरी गगरी ना भरन दे, अवगुण न कीजिये गुनिसन
या पारंंपारिक बंदिशी आजही गायल्या जातात, त्या कर्णमधूरही वाटतात. गायक आपल्या कुवतीनुसार रागांत रंग भरत असतो व रागाचे नवनवे पैलू श्रोत्यांस उलगडून दाखवित असतो.
राग संगीताची हीच तर खासियत आहे.कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करतां त्याला आपले गानचातूर्य दाखवून रसिकांचे मन जिंकायचे असते.
नाट्यसंगीत हा राग संगीताशी निगडीत उपशास्रीय गायन प्रकार आहे. बाल गंधर्वांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांची गोडी केवळ अवीट आहे. स्वयंवरातील नाथ हा माझा मोही खला, मानापमानांतील नयने लाजवित,कुलवधू नाटकांतील क्षण आला भाग्याचा,सौभद्रातील राधाधर मधुमिलिंद जयजय, किंवा अगदी अलिकडचे देवाघरचे ज्ञात कुणाला ही पदे यमन,यमन कल्याण रागांतीलच आहेत.
आपले सर्वांचे लाडके गायक/संगीत दिग्दर्शक कै.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांची तर बहुतांशी गाणी यमन रागांत अथवा त्यावर आधारित आढळतात. समाधी साधन हा तुकारामाचा अभंग आणि का रे दुरावा हे भावगीत, दोन्ही यमन मध्येच परंतु संगीत रचना करतांना त्या त्या काव्यातील भावनाविष्कारानुसार बाबूजींनी स्वरसमूहांचे नियोजन केल्यामुळे एकाच रागातील दोन गाणी कानाला वेगळी वाटतात.
हे त्यांचे चातूर्य आहे. हीच सुरांची जादू आहे.यमनमधील एक तीव्र म ही सगळी करामत करतो.
या रागाचा अभ्यास करतांना असे लक्षांत येते की भक्ती आणि शांत रसाबरोबर श्रृंगार रसालाही हा राग पोषक आहे.
ज्यांना संगीताची जाण नाही परंतु खूप आवड आहे त्यांना हा लेख वाचून यमन राग ऐकतांना त्याचा अधिक आनंद मिळेल अशी आशा वाटते.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈