☆ विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
आज ललिता पंचमी! म्हणूनच मी तुम्हाला हळदी-कुंकवाला बोलावते आहे. आज मी तुम्हाला आमच्या अन्नपूर्णेची ओळख करून देते. तशी तर अन्नपूर्णा सर्वांबरोबर माहेरुनच आलेली असते, पण ही अन्नपूर्णा थोडी वेगळी आहे. पण आधी मस्त चहा घ्या.
“काकू, चहा फक्कड झाला आहे”. हो ना? तोही ह्या आमच्या अन्नपूर्णेनच बनवलेला आहे. तर ह्या आमच्या कडील कर्मयोगी! सौ चंदा दिघे. आमची अन्नपूर्णा.
तशी त्यांची जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी पण पुणेच ! लहानपणी आपल्या आई बरोबर कर्मयोगच करत होत्या पण त्याच बरोबर शाळेतही जात होत्या. पुढे लग्न झाले आणि सुखावल्या. दोन मुले एक मुलगी, सासूबाई सर्वच कष्ट करत. छान मजेत होते. त्यावेळी त्या ब्युरोत सेवा कर्म करत होत्या. मुलीचे लग्न झाले. एका मुलाचे लग्न झाले. सर्व काही ठीक ठाक चालेले होते. घरात एक चिमुकली नात आली. चंदाबाई सुखाने कष्ट करत होत्या पण संसाराकडे पाहून विसरत होत्या. असेच दिवस चालले होते.
आणि एक वादळ आले. वादळात सगळेच कोलमडले. त्यांचा मोठा मुलगा पोहायला गेला असताना बुडाला आणि पाठचा तो त्याला वाचवताना बुडाला. काय हाहाकार! एकाच वेळी काळाने दोन्ही मुले हिरावली. दोघेही पती पत्नी खचले. खोल निराशेत गेले. सगळीकडे नुसता अंधार. पण काहीच दिवसात बागडणाऱ्या चिमुकलीकडे त्यांचे लक्ष गेले. तरुण सुंदर विधवा सून दिसली. आणि त्या अन्नपूर्णेने पदर खोचला. “पुनःश्च हरी ओम” करत कामाला सुरुवात केली. त्याच वेळी आमच्या सोसायटीत पोहोचल्या. सुविचारी अश्या ह्या दुर्गेने अजून एक निर्णय घेतला. तरुण सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. आणि नातीची जवाबदारी स्वीकारली. तिला मोठी केली, शिकवली आणि तिचे लग्न करून ती नीट पार पडली.
केवढे मोठे मन !! पण मनातली ही सर्व दुःखे एका गाठोड्यात घरीच ठेवून येतात. जसे मन तसे अन्न बनते. त्यामुळे नेहमी प्रसन्न. इथे फक्त कामाचाच विचार. त्यामुळे सगळे सुग्रास आणि राहणीमान पण तसेच. एवढी कामे करतात पण नेसलेल्या साडीला दिवसभर सुरकुती पण नसते. नवरात्री मध्ये तर रोज त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. सगळे सणवार आठवणीने साजरे करतात. आम्हालाही उत्साह देतात. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन त्या सहजपणे वापरतात. वॉट्सअँप , फेसबुक वर त्या छान सक्रिय आहेत.
आमच्या सर्वांकडे येताना, प्रत्येक सणावारानुसार त्या काहीतरी घेऊन येतात. यात्रेला गेल्या की एखादा फोटो घेऊन येतील. नागपंचमीला वैदेहीला बांगड्या, मेहंदी आणतील . दुःखात सुद्धा सुख शोधायला ह्या माउलींकडून मिळते. १३५ कोटी लोकांचे सुख सारखेच असेल, दुःख मात्र वेगवेगळी !! अशा माउली प्रत्येकीकडे आहेत, त्यांची उणीव आपण lockdown मध्ये अनुभवली आहे . तर चला आज मी तुमच्या सर्वांसमवेत त्या माऊलीची साडी, खणा-नारळाने ओटी भरते.
तुम्ही पण घरी जाऊन तुमच्या तुमच्या माऊलीची ओटी भरा!
या देवी सर्व भूतेषु क्षुधा रुपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
© सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈