सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – २) –रागनृपती भूप ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
मागच्या रविवारचा पहिला लेख वाचल्यावर अनेक वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया कळवल्या आणि काहींनी प्रश्नही विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता ‘एकूण स्वर सात असतात की बारा?’ तर आपण शुद्ध, कोमल, तीव्र स्वरांविषयी जाणून घेताना ह्या प्रश्नाचंही नेमकं उत्तर मिळेल. खरंतर ‘सूर अनंत असतात’ असं पं. कुमार गंधर्वांसारख्या गानतपस्व्याकडून एका मुलाखतीत ऐकल्याचं स्मरतं! त्यांच्या सूक्ष्म दृष्टिकोनातून नाही पण आपल्या सामान्य दृष्टिकोनातून तरी ह्याचाही थोडासा उलगडा होतो का पाहूया! मुळात ‘सा’ हा सप्तकाचा आधारस्वर म्हणता येईल. आधारस्वर म्हणजे काय?… तर सोप्या शब्दांत असं म्हणूया ‘नंबर लाईन वरचा झिरो’! आपण कुठेही संख्यारेषा काढत असताना आपले परिमाण(युनिट) काहीही असेल तरी शून्याचा बिंदू ठरल्यावरच त्याच्या आगेमागे आपल्याला संख्यांचे मार्किंग करता येते. तसंच एकदा ‘सा’ ठरला कि त्या स्थानाच्या अनुषंगाने मग इतर स्वर सहजी गाता/वाजवता येतात कारण त्यांची ‘सा’पासूनची अंतरं ठरलेली आहेत.
आपण फूटपट्टी डोळ्यांसमोर आणूया आणि २ इंच हे परिमाण(युनिट) घेऊ. आता शून्यावर ‘सा’(०) आहे असं मानलं तर शुद्ध रे (२), शुद्ध ग (४), शुद्ध म (५) प(७), शुद्ध ध(९), शुद्ध नि (११) आणि त्यापुढं वरचा सा(१२) अशी स्वरांची स्थानं ठरलेली आहेत. ही अशीच का? इतक्या अंतरावरच का? ह्याचं उत्तर ‘स्वर-संवाद’ हे आहे. ‘सा’चा ज्या-ज्या स्थानांवरील सुरांशी चांगला संवाद घडतोय असं वाटलं त्या-त्या स्थानाला सप्तकात मुख्य स्वराचं स्थान दिलं गेलं. आणखी सोपं म्हणजे ‘सा’ची ज्यांच्याशी सुंदर मैत्री झाली त्या सुरांना त्याच्या अंतरंगात म्हणजे सप्तकात स्थान मिळालं. तर असे अगदी घनिष्ट मैत्री होऊ शकणारे (फास्ट फ्रेंडशिपवाले) सहा मित्र ‘सा’ला सापडले आणि त्यापैकी पाच जणांच्या फास्ट फ्रेंडशी ‘सा’चीही चांगली मैत्री झाली. हे पाच जण म्हणजे ‘सा’ आणि शुद्ध रे च्या बरोबर मध्यबिंदूवर असणारा ‘कोमल रे (१)’, शुद्ध रे आणि शुद्ध ग च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ग(३)’, शुद्ध म आणि ‘प’च्या मध्यबिंदूवरचा ‘तीव्र म(६)’, ‘प’ आणि ‘शुद्ध ध’च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ध(८)’ आणि शुद्ध ध आणि शुद्ध नि च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल नि (१०)’! अशाप्रकारे आपल्याला बारा स्वर(शून्य ते अकरा) आहेत असं म्हणता येईल… सात मुख्य स्वर आणि त्यापैकी पाचांचे प्रत्येकी एकेक उपस्वर, ज्याला सांगितिक भाषेत विकृत स्वर असे म्हटले जाते!
एकूण पाहाता असं लक्षात येईल कि ‘सा’ आणि ‘प’ ह्या दोन स्वरांची एकच फिक्स्ड जागा आहे, त्यांचं कोणतंही व्हेरिएशन नाही, म्हणूनच त्यांना ‘अचल’ स्वर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना शुद्ध/कोमल/तीव्र असं काहीच संबोधलं जात नाही. उरलेल्या पाचही स्वरांचं प्रत्येकी एकेक व्हेरिएशन आहे. त्यापैकी जे व्हेरिएशन त्या-त्या शुद्ध स्वरापासून अर्धं युनिट खाली आहे त्याला ‘कोमल’ म्हटलं गेलं आणि एक व्हेरिएशन शुद्ध स्वरापासून अर्ध युनिट वरती आहे/ चढं आहे त्याला ‘तीव्र’ असं म्हटलं गेलं आहे.
तर ओळीनं स्वर असे येतील…. सा(०) कोमल रे(१) शुद्ध रे(२) कोमल ग(३) शुद्ध ग(४) शुद्ध म(५) तीव्र म(६) प(७) कोमल ध(८) शुद्ध ध(९) कोमल नि(१०) शुद्ध नि(११) आणि वरचा सा(१२). ह्याच स्थानावर सप्तक पूर्ण का होतं? तर साऊंड फ़्रिक्वेन्सीची संख्या इथं बरोबर दुप्पट होते आणि ती ऐकताना असं जाणवतं कि हा सूर मूळ ‘सा’ सारखाच ऐकू येतो आहे फक्त वेगळ्या, चढ्या स्थानावरून! अशा प्रकारे एका सप्तकात एकूण मुख्य सात स्वर आणि त्यापैकी पाच स्वरांचेच प्रत्येकी एकप्रमाणे पाच विकृत स्वर, असे एकूण बारा स्वर अंतर्भूत असतात असं ढोबळमानाने म्हणता येईल.
आता महत्वाची गोष्ट म्हणजे, हा सप्तकातील स्वरांतरांचा साचा असाच कायम राहातो आणि निसर्गदत्त आवाजानुसार गाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पट्टी (सा/pitch) वेगळी असू शकते.
यापुढं, नंबर लाईनचा विचार करता प्रत्येक दोन संख्यांच्या मधेही कित्येक बारीक रेषा असतातच. त्याचप्रमाणे प्रत्येक दोन स्वरांच्या मधेही अनेक फ्रिक्वेन्सीज असणारच. फक्त त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा ‘सा’शी अगदी सुखद संवाद होऊ शकत नाही, अतिसूक्ष्म फ्रिक्वेन्सीज तर आपल्या ऐकण्याच्या क्षमतेतच नसतात… पण म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं मात्र म्हणता येणार नाही. जसं पॉईंट(दशांश चिन्ह)नंतर बरेच नॉट (म्हणजे शून्यं) आणि त्यापुढं एखादी संख्या आली तर तिचं वजन आपल्याला वजनकाट्यावर दिसणार नाही, हाताला जाणावणार नाही, पण म्हणून तो सूक्ष्म वजनाचा ‘अणू’ अस्तित्वात नाही असं नाही म्हणता येत. इथं कुमारजींच्या वाक्याचा कदाचित थोडाफार अर्थ लागू शकतो.
संगीत शिकायला सुरू करताना बहुतांशी ज्या रागाने सुरुवात केली जाते त्या ‘भूप’ रागाविषयी आज थोडंसं जाणून घेऊ. शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातला राग म्हणून ह्याला प्राथमिक राग असं संबोधणं मात्र संयुक्तिक होणार नाही. कित्येक श्रेष्ठ कलाकारांनी आयुष्यभर रागसंगीताचा अभ्यास केल्यानंतर बऱ्याच पुढच्या टप्प्यावर असं विधान केलेलं आहे कि, ‘असं वाटतं अजून भूप समजलाच नाहीये.’ हा अर्थातच त्यांचा विनय आ्सतो, पण ह्याचा शब्दश: अर्थ न घेता ‘भूपाचा अभ्यास ‘नव्यानं’ करायला हवा आहे’ हे कोणत्याही कलाकाराचं वाटणं अस्थायी म्हणता येणार नाही. शुद्धच असल्यानं पटकन ओळखीचे वाटणारे ‘सा रे ग प ध सां’ हे सूर भूपाच्या आरोहात आणि ‘सां ध प ग रे सा’ हे अवरोहात येतात म्हणून वाटताना राग सोपा वाटतो. मात्र एखाद्याची संगीतसाधना जितकी सखोल होत जाते तितका त्याला एकच राग आणखीआणखी विशाल भासू लागतो. ह्या रागाच्या तर नावातच ‘राजेपण’ आहे! म्हणून रागांचा राजा, रागनृपती तो भूप! किशोरीताई आमोणकरांचं ‘भूपातला गंधार हा स्वयंभू आहे’ हे चिंतनयुक्त विधान केवढं विस्मयचकित करणारं आहे! ताईंचीच भूपातली ‘सहेला रे आ मिल जावे’ ही बंदिश न ऐकलेला संगीतप्रेमी अस्तित्वातच नसेल.
भूप म्हटलं कि पटकन डोळ्यांसमोर येतात ‘ज्योती कलश छलके’ (भाभी की चूडियॉं), ‘सायोनारा सायोनारा’ (लव्ह इन टोकिओ), इन ऑंखो के मस्ती के(उमराव जान), दिल हूं हूं करे(रुदाली) अशी अनेक हिंदी चित्रपटगीतं आणि ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ ‘धुंद मधुमती रात रे’ ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’ अशी कित्येक मराठी मधुर गीतं आणि सकाळी रेडिओवर लागणाऱ्या ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ ‘ऊठ पंढरीच्या राया’ ‘उठा उठा हो सकळीक’ वगैरे बऱ्याचशा भूपाळ्या! मात्र गंमतीची गोष्ट अशी कि रागशास्त्रानुसार भूप हा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जाणारा राग आहे! अर्थात, बहुतांशी रचनांमधे प्रामुख्याने भूप दिसत असला तरी त्यात इतर सूरही वापरलेले आहेत. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना किंवा ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ ही पं. जितेंद्र अभिषेकींची रचनाही भूपाची आठवण करून देणारी मात्र रागाशिवाय इतर स्वरही अंतर्भूत असलेली! ‘सुजन कसा मन चोरी’ हे संगीत स्वयंवर मधील नाट्यपद मात्र स्पष्ट भूपातलं, कारण त्याला भूपातल्या एका बंदिशीबरहुकूमच भास्करबुवा बखलेंनी स्वरसाज चढवला आहे. शोधायलाच गेलं तर अजून अनेक रचना सापडतील.
आता गंमत अशी आहे कि भूपाचेच आरोह अवरोह असणारा आणखीही एक राग आहे. पण त्याचे वादी-संवादी स्वर वेगळे असल्याने त्याचं रुपडं एकदमच वेगळं भासतं. भूपाचे वादी-संवादी स्वर हे ‘ग’ आणि ‘ध’ आहेत तर त्या रागाचे बरोबर उलट आहेत हा महत्वाचा फरक, दोन्हीचे थाटही वेगळे आहेत आणि अर्थातच फरकाच्या दॄष्टीने इतरही काही बारकावे आहेतच. वादी-संवादी स्वर हा काय प्रकार आहे? केवळ त्यांच्या बदलामुळं आरोह-अवरोह तेच असतानाही अख्खा वेगळा राग कसा निर्माण होऊ शकतो? हाच खरं तर आपल्या रागसंगीताचा आत्मा, वैशिष्ट्य आणि गर्भश्रीमंती आहे! या गोष्टींविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊया.
© सुश्री आसावरी केळकर-वाईकर
चेन्नई
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Basic mahiti pan kiti sundar mandali aahe…. Mazya sarkhya sangeet shiknaryan sathi tar tumche blog mhanje suvarna sandhich.