श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
☆ कवितेचा उत्सव ☆ वळणवाट ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆
पाय चालते वळणावरती अलगद वळत होते
मन पाखरू मात्र तयाला प्रश्न विचारित होते
सरळ रेषा ठाऊक मजला कुठे न वाटे वळावे
सरळ कोन हा आयुष्याचा दुभंग न त्याने व्हावे…
मी म्हणालो सरळ वाट ही नसते कधी कुणाची
वळसे घेता चहू दिशांना छेडिते तार मनाची
संकटांस या उभ्या आडव्या चुकवित जाते पुढे
वळणारी ही वाट शिकविते आयुष्याचे धडे…
जोवर आहे साथ मनाची सरळ पुढे चालावे
जिथे भेटते प्रांजळ अंगण तिथे चांदणे व्हावे
अडथळ्यांचा श्वास रोखूनी प्राण दिशेला द्यावे
वळणावरच्या वाटेचे मग काळीज आपण व्हावे…
© श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
मिरज, जि. सांगली
मोबाईल : 9922048846
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈