सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
मिरजेच्या पासून जवळ असलेल्या आरग या रेल्वे स्टेशन वर माझं लहानपण गेल. आसपास काहीच नव्हतं. पण मागच्या बाजूचा गाई-म्हशींचा गोठा त्यांची लहान पिल्ल कुत्री मांजर अशा प्राणिसंग्रहालयाच्या सहवासातच लहानपण गेल. शिक्षणानिमित्त मिरजेला आलो. प्राणिमात्रांची आवड फक्त मांजरावरच भागवावी लागली. मी अभ्यास करताना आमची सोनाली मांजरी माझा अभ्यास होईपर्यंत मांडीवर जागत बसायची. माझ्या यशाचा वाटा माझ्या या मुलीला दिल्याशिवाय रहात नसे.
लग्नानंतर आमची गावाबाहेर पोल्ट्री आणि त्याला लागून घर होत. टॉमी आणि बंड्या दोन कुत्र्यांच्या आधारावरच आम्ही रहात होतो म्हणा ना! ओसाड परिसर साप विंचू गोम मुंगूस बेडूक आणि चोर अस चित्र होत. एकदा रात्री अकरा वाजेपर्यंत कोणीच घरी आले नाही. लाईट गेले काय कराव सुचेना. अखेर माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर टॉमी आणि बंड्या यांच्याजवळ येऊन बसले. 100% खात्रीचे अंगरक्षक. बाळाला नवख्या कोणी घेतले आणि तो रडायला लागला की दोघे बेचैन व्हायचे. “बाळ रडतोय लक्ष आहे की नाही” अस नजरेतून मला सांगायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला मीत्यांच्याजव,ळ ठेवायची. काम होईपर्यंत जबाबदारपणे दोघे त्याला सांभाळायचे. टॉमी, मी साडी बदललेली दिसली की, “मी पण येणार” असं म्हणून मागं मागं यायचा. दोघांच्या भुंकण्यातून साप आहे की चोर आहे की त्याला काही हवंय, हे बरोबर समजायचं. आठ नऊ वर्ष या मुलांनीच आम्हाला सांभाळलं म्हणायला हवं. टॉमीला कॅन्सर झाला. ऑपरेशन झाले. निमूटपणे तोंड वर करुन औषध घ्यायचा. दिवाळीचा सण साजरा झाला. दिवाळीचा लाडू थोडासा खाल्लान आणि दुसरे दिवशी स्वर्गवासी झाला. बंड्या ही किरकोळ दुखण्याने गेला. दोन मुलांची उणिव सतत भासू लागली. लवकरच आपण होऊन छानशी गोंडस कुत्री पिंकी आपण होऊन आली. आणि आमचीच झाली. पहिल्या वेळेला दहा पिल्ले झाली. तिला कोणीतरी पळवून नेल.तीन आठवड्यानी पोट खपाटीला गेलेलं, अंगावर गोमाशा भरलेल्या अशा अवस्थेत परत आली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. प्रथम पिलानी आईला ओळख ले नाही. नंतर मात्र आनंदाने नाचायला लागली. कोरडीच आचळ ओढायला लागली. नाईलाजाने एक पिल्लू ठेवून घेतलं. टोनी. दिसायला पिवळाबारीक, गोरा रंग ,उंच, कायम ताठ बसणारा असा टोनी नौ वर्षे साथ दिलीन त्यानं. त्याला फिरायला मीच न्यावं असा त्याचा हट्ट असायचा. “तूच चल” अस म्हणून माझ्या मागे लागायचा. मुलांबरोबर चेंडू खेळायचा. एकदा मुलांच्या मागे लागून शाळेत ही गेला. शेवटी त्याला घेऊन मुलं परत आली. किती अनुभव सांगावे तितके कमीच. चिमा मांजरी पिलांना शिकार शिकवण्यासाठी काहीना काही घेऊन यायची. एक दा तर जिवंत साप घेऊन आली. पिलांसाठी उंदीर पाली किडे सगळ्यांचा फडशा पाडायची. मागे बांधलेली जयू नावाची गाय ही एक मुलगी. तीच शिंगाचा ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या जखमेवर रोज औषध घालायला हव ती माझ्याशिवाय कोणालाच घालून देत नव्हती. आपल्या सूक्ष्मातल्या भावभावना ही तिला कळत असाव्यात याची खात्री झाली. या सगळ्या मनाच्या नात्याच्या मुला-मुलींनी अनेक संकटांपासून चोर, विंचू, साप, यापासून वाचवलंयआम्हाला. आता आमच्याकडे चिंगी आणि गोल्डी ही श्वान जोडी काळूराम सुंदरी आणि टिल्ली हे मार्जार त्रिकूट मस्त मजेत राहून आम्हालाही खूप आनंद देतात. या मुलांशी मी गप्पा मारत असते. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायचं ,प्रश्न विचारायचे, आणि उत्तरही आपणच द्यायचं. बाहेरून घरी आलो की पहिलं स्वागत तेच करतात किती आनंद वाटतो ना! ही सगळी आमची मुलं आणि आम्ही त्यांचे आई वडील अस नातं आहे म्हणाना. रस्त्यात जखमी झालेल्या प्राण्यांनाही “राहत “,पीपल फॉर अनिमलच्या” मदतीने उपचार करतो. निपचित पडलेल्या बैलाच्या पोटाचे ऑपरेशन झाले. आणि चार बादल्या प्लास्टिक पिशव्या काढल्या. पिशव्यातून खरकटे टाकणाऱ्यांना काय सांगावे?बऱ्या झालेल्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव पहाताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं “जीव सेवा हीच ईश्वरसेवा” हे तत्व मनोमन पटत.
कर्मयोग, ज्ञानयोग, आणि भक्ती मार्गाद्वारे आमची मुलं-मुली, (प्राणिमात्र )यांच्यामधील परमेश्वराच्या रूपात पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या सहजीवनाच्या धाग्यांच्या गुंफणीतूनच माझ्या जीवनाच सुंदर वस्त्र विणलं गेलंय. किती सुंदर म ऊ मुलायम उबदार आणि रंग बिरंगी.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली
फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈