श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
नर्स विचारात पडली होती. इकडे रोझाला आराम वाटू लागेपर्यंत तिकडे डिरांगची बेचैनी वाढत जायची. त्याची व्याकुळता पाहून रोझा हैराण व्हायची. दोघांच्या वयात खूप अंतर होतं. एकाएकी तिला वाटलं ‘तशीही मी शहाऐंशी पार करणार आहे. कुणी मागे नाही, कुणी पुढे नाही. आणखी जगून तरी काय करणार आहे? पण या मुलापुढे तर सारा भविष्यकाळ आहे.’ शेजारून जाणार्या डॉक्टरांना ती म्हणाली, ‘सर, एक निवेदन आहे.’
‘मिस रोझा, आम्हाला आपल्या त्रासाची जाणीव आहे. जितकं शक्य आहे, तितकं आम्ही आपल्यासाठी करतोच आहोत.’ त्यांना वाटलं, तिला काही तक्रार करायची आहे.
‘जी, तेच म्हणते आहे मी! मला आता व्हेंटिलेटरची गरज नाही.’
‘म्हणजे?’ ते एकाएकी मागे वळले. चष्यातून बाहेर दिसणारे डोळे काहीच न समजल्याचा संकेत देत होते.
‘मी ठीक आहे. माझ्यापेक्षा डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे.’
‘मिस रोझा काय बोलताय आपण?’
‘जी, माझी इच्छा आहे की मला व्हेंटिलेटर लावण्याच्याऐवजी आपण त्याला लावा. तशीही मी वयाच्या मानाने जास्तच जगले आहे.’
डॉक्टर रोझाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांना दुविध्यात पडलेलं बघून रोझा आपल्या अडखळत्या आवाजावर जोर देत म्हणाली, ‘मला एवढं कर्तव्य तरी पूर्ण करू दे. त्या नवयुवकाचे प्राण वाचवू देत.’
हतप्रभसे डॉक्टर डिरांगकडे पाहू लागले. त्यांना दोघांचीही चिंता वाटत होती. वय ,रंग, धर्म, जात असा कुठलाही भेदभाव न करता जीवनाचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य होतं, पण रोझाने प्रेमाने, मानवतेच्या दृष्टीकोनातून धरलेला आग्रह स्वीकारण्यात त्यांना काहीच हरकत वाटणार नव्हती.
तरुणाची प्रकृती बिघडत चालली होती.
‘जरा घाई करा. त्याचा जीव वाचवा.’
ना कसला पेपर, ना कसली सही, ना नोकरीची चिंता. चिंता एकच होती. एक जीव वाचवण्याची. कुठलाही उशीर न करता रोझाचा वेळही डिरांगला दिला गेला. एक असं काम तिने केलं होतं ज्याबद्दल ती स्टीव्हला सांगणार होती. अर्थात वर गेल्यावर…
तोदेखील खूश होऊन म्हणेल, ‘रोझ, तू खरोखरच रोझ आहेस. जीवनाचा सुगंध पसरवते आहेस.’
हे ऐकून रोझचे गाल निश्चितपणे लाल होतील.
एक तास होऊन गेला होता. अर्ध जागृत, अर्ध निद्रावस्थेत ती स्टीव्हशी बोलत होती. डिरांगचे डोळे हळू हळू उघडू लागले होते आणि रोझाचे बंद होऊ लागले होते. तिच्या ओठांवर मात्र हसू होतं कारण समोर तिचा हात धरण्यासाठी स्टीव्ह उभा होता. जीवनाची देवाण-घेवाण झाली होती. मृत्यूने आमंत्रण स्वीकारलं होतं. वरचं छत धूसर होऊ लागलं होतं. क्षणभरात घेतलेला निर्णय समाधानाचा मृत्यू देऊन गेला होता.
आपला मृत्यू निवडण्याचं सुख सगळ्यांनाच मिळत नाही. रोझाला ते मिळालं होतं. लाकडाची हांडी स्वत:च चुलीवर चढली होती. कारण जाळ पेटलेला राहायला हवा होता.
मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप
भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈