सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ सत्यवानाची सावित्री ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
जवळपास गेली चाळीस वर्षे इंदू माझ्या घरी काम करते ती माझ्याकडे आली तेव्हा आम्हा दोघींची मुले पहिलीत होती आज आम्हा दोघींच्या घरी गोकुळ आहे.
इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आमचा! आता ती आमच्या कुटुंबातीलच एक झाली आहे. स्वतःचं एवढं मोठं कुटुंब असूनही ती माझ्या घरात रमलेली असते. आणि माझ्यात गुंतलेली!
तिचा सगळा जीवनप्रवास तसा खडतरच! अशिक्षिततेची झालर असलेलं जिणं तिच!! ठेंगणी ठुसकी अशी इंदू कष्ट करून नीटनेटका संसार करणारी अशी.. ‘तुमच्या वानी तुमच्या वानी’असं म्हणून जमेल तेवढं माझं अनुकरण करणारी . अशी ही इंदू……
माझ्याच घरात तिने स्वयंपाकाचे धडे घेतले. जेवढ्या म्हणून माझ्या गोष्टी तिने डोळ्याने पाहिल्या हाताने शिकल्या त्याचं तिला अप्रूप आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीचे भान ती ठेवते पण तिच्या नशीबाची गाडी मी पळवू शकत नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे.
तिचा नवरा पहिल्यापासूनच व्यसनी…रोजची भांडण रोज वाद, कधीकधी होणारा नशेचा अतिरेक हे मी इतकी वर्ष पाहात आले आहे जीवनाचा समतोल राखत ती बिचारी जन्मभर राबते आहे.
सततच्या व्यसनासाठीच्या पैशाची मागणी आणि पुरवले नाहीत की होणारी मारहाण यांनी कातावून गेलेली इंदू माझ्याकडे आल्यावर सगळं दुःख विसरते आताशा तर रोजचेच रडगाणे गायचे ही तिने सोडून दिलेआहे.
कधीतरी तिचा चेहरा पडलेला दिसला की मी खोदून तिला विचारत असते पण दुःखाचं प्रदर्शन मांडायचं आणि नवऱ्याला नावं ठेवायची हे तिच्या स्वभावात नाही पण अती झाले की कधीतरी ती माझ्यापुढे मोकळी होते.
करोनाचे अस्मानी संकट आले तशी तिच्या जीवनाची घडीच विस्कटली यंत्रमाग बंद पडले. दोन्ही मुलांचं काम गेलं. पैशाची चणचण भासू लागली. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत करत होतेपण ती खिन्न आहे.
त्यात आणखी तिच्या नवऱ्याची रोजची दारूसाठी पैशाची मागणी
चार दिवस सलग ती आलीच नाही तिच्या मुलाचाही फोन लागेना.एखादा दिवस वाट बघावी आणि मग पाठवावं कुणालातरी तिच्याकडे असा मी विचार करत होते तोवरच दारात उभी !मान खाली घालून काहीशी अस्वस्थच दिसली .घरात आली आणि मटकन खाली बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती दुसऱ्याच कारणासाठी….कुणा मुलाला कोवीड झाला की काय असे वाटले. बऱ्याच वेळानंतर बोलती झाली…
“मालक गेलं वहिनी “…..
“अगोबाई कशानं गं? मला एकदम धक्का बसला.”
“वहिनी जनमभर मी त्याला दारूला कधीबी कमी केलं न्हाई.त्यांच्या व्यसनासाठनं राबलो.तुम्हाला ठाव आहे. घरात दुध नसलं तर चालल पर त्याच्यासाठनं मी कायम पैका दिला. परवा दिवशी त्यांच्या हातात पैसे हुतं पर दारू मिळना म्हनूनशान लै चिडचिड चिडचिड करत हुतं आणि कुठं जाऊन ते हाताला लावत्यात ते काय म्हणतात शनि टायझर पिऊन आलं बघा आनी दवाखान्याला न्यूस तो पतुर डोळ्या देखता गेलं.” असं म्हणून तिने अक्षरशः हंबरडा फोडला.
“म्या त्यांची दारू कवा बंद केली न्हाई. मी त्यांच्या दारू साठनच राबलो का न्हाई वहिनी? मला ठाव असतं दारू कुठं मिळतीया ते तर कुठून बी दारू आनून पाजली असती. त्यांच्यासाठनं काय बी केलं असतं म्या”….. आणि पदर डोळ्याला लावून ती हमसाहमशी रडू लागली
मी आ वासून पाहत बसले त्या सत्यवानाच्या सावीत्रीकडे !!……
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित
सत्यवानाची सावित्री आवडली.