☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “भूपातील निषाद” – सुश्री आसावरी केळकर वाईकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
पुस्तक — कथा संग्रह – भूपातला निषाद
लेखिका — आसावरी केळकर—वाईकर
प्रकाशक – श्री नवदूर्गा प्रकाशन
प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २०२०
किंमत — रु.३८०
हे पुस्तक वाचताना प्रथमत:जाणवतं ते हे, की, आसावरी केळकर —वाईकर यांच्या लेखनाला एक भक्कम, वैचारिक बैठक आहे. भूपातला निषाद या कथासंग्रहात चार दीर्घकथा आहेत. चारही कथांतले विषय वेगळेआहेत. विषय चौकटी बाहेरचे नसले तरी ते हातळतानाचा दृष्टीकोन निराळा, पुढचं पाऊल ऊचलणारा, जाणीवपूर्वक काही संदेश देणारा आहे.
सुश्री आसावरी केळकर वाईकर
प्रत्येक कथेमध्ये, छोटी मोठी ऊपकथानके आहेत. पण ती एकमेकांमधे गुंफताना कथेचा मूळ गाभा,ऊद्देश अथवा दिशा बदलत नाही. कथा कुठेही भरकटत नाही. म्हणूनच ती बांधेसुद आणि सुसूत्र वाटते. कथेचा ओघ, प्रवाह खुंटत नाही. म्हणूनच ती वाचकाचं मन पकडून ठेवते.
भूपातला निषाद ही एक प्रेमकथाच आहे. दीर आणि वहिनीच्या मैत्रीपूर्ण प्रेमाची ही कथा आहे. कथेतलं सच्चेपण,पावित्र्य लेखिकेनं शब्दसामर्थ्यानं नेमकेपणाने जपलेलं आहे . ही कथा वाचत असतांना काही ठिकाणी नक्की वाटतं की, हे चौकटी बाहेरचं आहे, अवास्तव आहे, अयोग्य आहे, पण त्याचं पटवून देणारं ऊत्तर लेखिकेनं यात दिलंआहे.! भूप रागात तसे सा रे ग प ध सा असे पाचच सूर असतात. पण तीव्र मध्यम आणि निषादाचा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे रागाच्या आकृतीबंधाला धक्का न लागता, रागाचं सौंदर्य वाढतं. आणि मग भूपातला निषाद ही कथा मनाला पटून जाते.
अनुबंध या कथेत, पीडीत स्रियांच्या पुनर्वसनासाठी ऊभारलेल्या संस्थेची प्रमुख संचालिका नीना ही जबरदस्त मनोबलाची व्यक्ती भेटते.. तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांतून, जसे की तिच्या विशेष बहिणीच्या आयुष्यात घडलेल्या दु:खदायी घटनेपासुन ते आई वडील, नवरा यांचे अकस्मात मृत्यु, संस्थेतील तिच्यावर माया करणारी माणसं,त्यांच्या कथा,सुंधाशु नावाच्या फसव्या माणसाची भेट आणि त्यामुळे तिला सतत आठवणारा तिचा नवरा माधवन,याचा चांगुलपणा .. आणि नंतरचे तिने घेतलेले निर्णय..इथपर्यंत कथा सुरसपणे घडत जाते. एक चांगला विचार देऊनच ही कथा संपते.. रुढी परंपरा सोवळं ओवळं यात अडकून माणूसकीलाच पारखी झालेली माणसेही यात भेटतात.
आणि भलेही नात्यांची पडझड झाली तरी त्यांना टक्कर देणारी भक्कम माणसेही असतात हेही या कथेत जाणवतं योजना ही कथा विसंवाद वा संवाद तुटल्यामुळे एका अत्यंत संवेदनाशील आणि बुद्धीमान व्यक्तीच्या विस्कटलेल्या मानसिकतेची आहे.ईश्वराच्या अस्तित्वाचा, सत्याचा शोध घेण्यासाठी मनातली चीड, क्रोध,कडवटपणा घेऊन ,घर सोडलेल्या तरुणाची ही कथा वाचनीयच आहे. तो आणि त्याच्या निर्णयामुळे त्याच्यावर प्रेम करणारी दुखावलेली माणसं पुन्हा एकत्र येतील का? ही ऊत्सुकता टिकवतच ही कथा पुढे जाते…
ज्याचं त्याचं आभाळ या कथेतही तीन वेगवेगळी कथानकं आहेत.तिघीही वेगवेगळ्या स्तरातील असल्या तरी स्वत:च्या दु:खावर मात करण्यासाठी, अन्यायाला ऊत्तर देउन निर्णय घेणार्या आहेत… इथेही पुन्हा समाज, चौकट ,परंपरा,त्यातून सहन करावी लागणारी टीकाटिप्पणी आहेच.पण लेखिकेनं याही कथेतून, कुणी कसं जगावं, ज्याचं त्याचं आभाळ.. त्यात इतरांची भूमिका नगण्यच… हा सुरेख विचार मांडलाय…
एकंदर भूपातला निषाद हा चार सुंदर कथांचा संग्रह आहे हे नक्कीच. कुठेतरी कथा वाचताना वाटतेही की, कथा पुढे सरकत नाही, थांबल्यासारखी वाटते.. रीपीटेशनही जाणवते, पण तरीही कथा दिशाहीन होत नाही. कथेवरची पकड सुटत नाही. हे महत्वाचे…
लेखिका आसावरी केळकर वाईकर यांचे मनापासून अभिनंदन…!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
१६/१०/२०२०
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈