☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ६. क्रोधाचा परिणाम
कोण्या एका गावात ‘नरेश’ नावाचा एक माणूस रहात होता. त्याने एक माकड व एक बोकड यांचे प्रयत्नपूर्वक पालन केले होते.एकदा त्याला महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. माकडाला व बोकडाला कुठे ठेवावे हा त्याला मोठा प्रश्नच पडला. शेवटी नरेशने त्या दोघांना आपल्या बरोबर न्यायचे ठरवले.
नरेशने शिदोरी म्हणून बरोबर दहीभात घेतला. तिघेजण मार्गक्रमण करू लागले. चालता चालता थकल्याने नरेशने एका वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले. माकडाला व बोकडाला त्याच वृक्षाखाली बांधून व त्यांच्याजवळच शिदोरी ठेवून तो पाणी आणायला निघाला.
नरेश गेल्यावर माकडाने सगळा दहीभात खाऊन टाकला. हाताला लागलेले दही बोकडाच्या तोंडाला फासले व आपण त्या गावचेच नाही असे भासवीत दुसरीकडे जाऊन बसले. इकडे नरेश जेव्हा पाणी घेऊन परतला, तेव्हा तो भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने खाण्यासाठी शिदोरी उघडली आणि पाहतो तर काय! शिदोरीत अन्नाचा कणही उरलेला नव्हता. फक्त बोकडाच्या तोंडाला चिकटलेले दही त्याला दिसले.
‘मी माझ्यासाठी आणलेले सर्व अन्न ह्याने खाल्ले’ ह्या विचाराने नरेशच्या रागाचा पारा चढला, व रागाच्या भरात त्याने निष्पाप बोकडाला मारले.
तात्पर्य – खरोखरच क्रोध माणसाला अविवेकी बनवतो. न्याय-अन्यायाचे भान त्याला रहात नाही.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈