सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—५ ?

!! बलिप्रतिपदा–भाऊबीज !!

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते.शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो.तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते.दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो.याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे.जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी,नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष,  भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो.म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात.थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान,श्रद्धा,सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ  आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे.

याच्या दुसऱ्या दिवशी येते भाऊबीज.बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला  ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. यमराजाची बहिण यमुनाने या दिवशी आपल्या घरी त्याची पूजा केली, त्याला ओवाळले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. ती म्हणाली, “दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस.” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून दरवर्षी  भाऊबीज साजरी होते

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते  निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते.सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची,तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला बहिणीची आठवण येते.

या नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे,मावस भावंडं कोणतीही असोत हे नाते मनापासून जपावे हेच हा दिवस सांगतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments