श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

मनाच्या कुपीत..आठवणींच्या सा‌‌ठवणीत पडून असतं बरंचसं. आठवूच नये असं जसं , तसंच आठवत रहावं असंही बरंच कांही. असं असो वा तसं जुनंच सगळं. भूतकाळातलं. आठवत रहावं असं असलं , तरी सारखं तेच आठवत रहाणं म्हणजे भूतकाळातच जगणं. आठवू नये असं तर दामटून बसवलं नाही, तर डोकं वर काढतच रहातं सारखं सारखं लवचटासारखं. आठवणी हव्या-नकोशा कशाही असोत त्या उपटून फेकून नाहीच देता येत. मग करायचं काय? हव्याहव्याशा, चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या निगुतीनं. आवडती वस्तू सहज कधी हाताळून पहातो ना , तसं अलगद आठवून पहायच्या क्षणकाळ. तेवढाही श्वास पुरुन उरतो वर्तमानात जगण्यासाठी. नकोशा आठवणींकडे करायचं दुर्लक्ष. मुद्दामच. पाहूनही न  पाहिल्यासारखं. हिरमुसल्या होऊन मग रहातात पडून न् जातात विरुनही कधीतरी हळूच खाली मान घालून निघून गेल्यासारख्या. आठवणी कशाही असोत, त्या हव्यातच. पण भल्याबुऱ्याचं भान जागं ठेवण्यापुरत्या. जगायचं कसं आणि कसं नाही हे सांगण्या-सुचवण्यापुरत्या.

आठवणी हव्यातच सोबतीपुरत्या. अंधारल्या वाटेवरच्या इवल्याशा दिव्यासारख्या. मिणमिणताच पण प्रकाश देणाऱ्या. चुकत असेल वाट तर रस्ता दाखवणाऱ्या.

आठवणी म्हणजे अनुभवच तर असतात भूतकाळात जमा झालेले. हवेसे किंवा नकोसेही. मनाच्या खोल तळाशी पडून असतात वाट पहात, हांक आली की झरकन् झेपावण्यासाठी. आठवणी कशाही असोत सारखं कुरवाळत नाही बसायचं आवडती गोळी चघळल्यासारखं, किंवा झिडकारायच्याही नाहीत कडवट कांहीतरी थुंकून टाकल्यासारख्या. न जाणो, त्या कडवट असल्या, तरी उपयोगीही पडत असतात कधीतरी औषधासारख्या..!

औषधासारख्याच तर असतात आठवणी. (मनाच्या) तब्येतीला भानावर आणणाऱ्या. गोड सिरप गोड असतं म्हणून आवंढा न गिळताच तोंडात नसतंच ना धरून ठेवायचं. किंवा असेल गोळी औषधाची कडवट किंवा गोडसरही, पण तीही चघळत नसतीच रहायची तासनतास. गिळून टाकायची पाण्याच्या एका घोटाबरोबर क्षणार्धात. आठवणी लगडलेल्या असतातच विचारांना , येणाऱ्या.. जाणाऱ्या..! जाऊ द्यायच्या आल्या तशाच जाणाऱ्या विचाराबरोबर तशाच अधांतरी तरंगत. जात नाहीतच त्या कायमच्या. जाऊन बसतात आपल्याच मनाच्या तळाशी वेळ येईल, तेव्हा अलगद.. हळूवार सावरायला आपल्याच मनाला…!!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments