सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  4 – राग मालकंस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

ती मध्यरात्रीची वेळ

सूर आले कानी

होते कोमल ग ध नी

मन माझे गेले मोहुनी…

क्षणांत भावना श्रृंगाराची

तसेच पवित्र भक्तिभावाची

हेच असे स्वरांचे ह्या वैशिष्ठ्य खास

प्रचलित तो राग मालकंस…

 

वरील माझ्या या काव्यपंक्तींवरून वाचकांच्या लक्षांत आले असेलच की आजच्या लेखांत आपण कोमल स्वराधिष्ठित मालकंस या रागाचे विवेचन करणार आहोत.

भैरवी थाटजन्य हा राग! किंबहुना भैरवी रागांतून रिषभ(रे) व पंचम(प) हे स्वर काढून टाकले की झाला मालकंस! म्हणजे सा ग(कोमल)म ध(कोमल)नि(कोमल) या पांचच स्वरांचा हा ओडव जातीचा राग! तरीसुद्धा गायन/वादनासाठी फार विस्तृत बरं का.

नि सा ग म ध नि सां असा याचा आरोह तर सां नि ध म, ग म ग सा असा थोड्या वक्र स्वरूपाचा अवरोह.

कोमल स्वरांमुळे अतिशय कर्ण मधूर पण त्याच बरोबर करूण रसाचा आविष्कार करणाराही.

ह्या रागांतील स्वररचना ही त्यांतील शुद्ध मध्यमाभोवती फिरत असते.त्यामुळे सहाजिकच मध्यम वादी आणि त्याच्याशी सुसंवाद साधणारा षडज हा संवादी स्वर मानला आहे. असे असले तरी गंधार व धैवतही सातत्याने वावरत असतातच. अतिशय भारदस्त असा हा राग सर्वच रसिकांचा आवडता नि लाडका आहे.

स्व. भारतरत्न भीमसेन जोशींनी अतिशय प्रचलित केलेली ‘रंग रलिया करत सौतन के संग’ ही बंदिश ऐकतांना नायिकेचा प्रियकर तिला सोडून सवती सोबत रात्र घालवितोह्या विचाराने श्रृंगारावाचून तळमळणारी आणि विरहाने व्याकूळ झालेली नायिका आपल्या डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य मालकंसच्या ह्या स्वरांत असल्याचे जाणवते. अर्थात पेश करणारा कलावंतही तितक्याच ताकदीचा असला पाहीजे हे निश्चित!

सौ. बकूळ पंडितांनी सहजसुलभतेने गाऊन अजरामर केलेले ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे पाणिग्रहण नाटकांतील पद न ऐकलेला रसिक विरळाच असेल. याच मालकंसांत निबद्ध केलेली कानडा राजा पंढरीचा किंवा बैजू बावरा या चित्रपटांतील ‘मन तरपत हरी दरसनको आज’ ही भक्तीगीते भक्तीरसांत भिजलेली आपण पहातो. श्री.अनूप जलोटा यांचे सर्वश्रृत भजन

‘क्षमा करो तुम मेरे प्रभूजी

अबतकके सारे अपराध

धो डालो तन की चादरको

लगे है उसमे जो भी दाग’ ।। यांत भक्ताची जी तळमळ आहे, जी क्षमायाचना आहे ती केवळ मालकंसच्या स्वरसाजामुळेच प्रभूपर्यंत पोहोचली असे वाटते.

छोटा गंधर्वांचे देवमाणूस नाटकांतील ‘सुखवित या संसारा’ या पदांतून दोन जिवांच्या प्रीतींतून मिळणारे समाधान हेच स्वर व्यक्त करतात तर रणदुंदुभी नाटकांतील’दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे मातृभूमीचे प्रेम व्यक्त करणारे पद मालकंसातच गुंफलेले आपण ऐकतो.

एकूणच विशाल अंतःकरणाचा हा राग  श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments