श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ ☆ तहान या कथेविषयी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ , गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.
तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती संगत होत्या. इतक्यात तिथे एक ८-९ महिन्याची एक मुलगी रंगत आली. माहिती सांगणार्या बाईंनी तिला प्रेमाने उचलून कडेवर घेतले आणि म्हणाल्या, ‘ही आमची पहिली दत्तक मुलगी. आता हळू हळू आम्ही काही अनाथ मुलांना इथे कायम स्वरूपी आसरा देणार आहोत.’ मुलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याकडून ही मुलगी आम्ही घेतली. एखाद्या आईने आपल्या मुलीच्या भवितव्याबद्दल बोलावे, तशा स्वप्नाळूपाणे त्या म्हणाल्या, ‘आम्ही तिला डॉक्टर करायचं ठरवलय.. नंतर जर्मनीला पाठवू.’
’तिचा आई-वडलांचा काय?’ मी विचारलं. ’सगळी जबाबदारी आम्हाला घेणं शक्य नाही या परिसरात खूप भिकारी आहेत. आम्ही त्यांना म्हंटलं, ’तुमची मुलगी आम्ही दत्तक घेतो. तिला शिकवतो. तिच्या आयुष्याचं कल्याण करतो. तुमच्यासारखं भीक मागत तिला फिरावं लागणार नाही पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला तुमची आई-वडील म्हणून ओळख द्यायची नाही.’ त्यांनी ते मान्य केलं.
ही सगळी माहिती ऐकल्यावर माझ्या डोक्यात एक लख्ख वीज चमकली. त्या विजेच्या प्रकाशात ती ८-९ महिन्याची मुलगी एकदम तरुणी दिसू लागली. तेजस्वी, बुद्धीमान, गोड, नम्र, मनमिळाऊ. या तरुणीची कथा मी घरी जाईपर्यंत मनातल्या मनात तयार झाली.
त्या मुलीला मी नाव दिलं जस्मीन. मोहक सुगंधाने सर्वांना हवीशी वाटणारी जस्मीन. त्या क्रेशचही मी बारसं केलं, ‘ममता निकेतन’ आणि कथेतल्या आणि पात्रांनाही मी माझी नावे दिली. मुख्य फादर फिलीप. ‘ममता निकेतन’ची व्यवस्था पाहणार्या मिस रेमंड.
त्या विजेच्या प्रकाशात मला दिसलं, जस्मीन बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास होऊन आता पुढचं मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघालीय. ‘ममता निकेतन’च्या हॉलमध्ये तिला निरोप देण्यासाठी सगळे जमलेत. तिचं गुणवर्णन चाललय. तिचा आदर्श सगळ्यांनी डोळ्यापुढे ठेवावा वगैरे… वगैरे…
जस्मीनच्या डोळ्यापुढून मात्र तिचा भूतकाळ सरकतोय. ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी तिला आपली जीवन कहाणी, कुणाकुणाच्या बोलण्यातून तुकड्या तुकड्याने कळली. लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी, हेही तिला कळले. पण नक्की कोण आपले आई-वडील हे मात्र तिला माहीत नाही. ते विचारायचे धाडसही तिला कधी झाले नाही.
निरोप समारंभाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ती म्हणते, ‘ ‘लेप्रसी’ विषयाचा विशेष अभ्यास करून, त्यावर संशोधन करण्याची आणि ‘ममता निकेतन’च्या परिसरातील रुग्णांवर उपचार करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचं तिचं ध्येय आहे.’
जस्मीन बोलतेय. होलामधल्या तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठं डिजिटल पोस्टर लावलेलं आहे. त्यामध्ये प्रभू येशू एका महिलेच्या हातावर पाणी घालतोय आणि ती महिला ओंजळीने पाणी पितेय, असे चित्र आहे. चित्राखाली लिहिले होते, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’ हे पाणी अर्थात आध्यात्मिक आहे. प्रभू येशूचा उपदेश म्हणजेच हे पाणी आहे. (हे चित्र मी मिरज मिशन होस्पिटलच्या दर्शनी भागात लावलेले पाहिले होते.)
बोलता बोलता जस्मीनचं लक्ष त्या पोस्टरकडे जातं. तिला वाटतं, आपण अगदी समजायला लागल्यापासून हे पाणी पितोय. पण आज आपल्याला अतिशय तहान लागलीय. त्या तहानेने आपले प्राण कासावीस झालेत. आपले आई-वडील कोण, हे जाणून घेण्याची तहान. त्यांना बघण्याची तहान.
जस्मीन निघण्याची वेळ होते. ती टॅक्सीत बसताना शेवटची नजर त्या भिकार्यांकडे टाकते. मनोमनी म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो मला आशीर्वाद द्या.’ टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सीचा पाठलाग करतात.
(उद्यापासून ‘तहान ’ कथा क्रमश:……)
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈