श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
आज ब-याच दिवसांनी लिहायचा योग आलाय. बेलवडीतील तुकोबांच्या पालखीच गोल रिंगण लाईव्ह पाहता पाहता विषय ही जरा वेगळा सुचलाय.
आपल्याकडचे भक्ती संगीताची (मराठी) मोठी परंपरा आहे. यातही ‘विठ्ठलाची भक्ती गीते’ ही साधारण पणे सर्वाना माहीत असतात, आणि जास्त प्रसिध्दही असतात. आळंदी , देहू वरून पालख्या निघाल्या अन जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागते तसतसं वातावरण एकदम भक्तीमय होऊन जाते. आजकालची न्यूज चॅनेलही वारीचा वृतांत दाखवताना मागे एखाद भक्ती गीत लावतात. हे सगळं सांगायचे कारण म्हणजे नुकतेच मला माझे सगळ्यात आवडते गाणे / भक्ती गीत ‘इंद्रायणी काठी’ ऐकायला मिळाले. पंडित भीमसेन जोशींनी गायलेले हे गाणे केंव्हाही ऐकले की मला ब्रह्मानंदी टाळी वाजल्याचा आनंद मिळतो. ‘गुळाचा गणपती’ या सिनेमात पु. लं. नी ही हे गाणं अतिशय सुरेख घेतले आहे.
मंडळी या गाण्याबद्दल आणखी एक विशेष अशी माझी आठवण आहे. पूर्वीच्या काळी कलाकार मंडळी उदा गायक, वादक आपली कला हे देवासमोर सादर कारायचे. देवळात जाऊन कुठलीही बिदागी/ मानधन न घेता आपली कला सादर करण्यामागे कृतज्ञताा व्यक्त करणे हा हेतू होता. एखाद्या कलेत प्राविण्य मिळाल्यावर देवाचा आशिर्वाद घेऊन पुढे जायचे ही भावना त्यामागे असायची.
पण आजकाल sms सारख्या माध्यमातून मतांची भीक मागून सेलिब्रीटी बनलेल्या आणि अशाप्रकारे ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या’ कलाकारांना ही माहितीतरी आहे का? असं वाटण्या इतपत परिस्थिती सध्याआहे. गणेशोत्सव मंडळ, महोत्सव, अॅवार्ड कार्यक्रमातील लाखाची बिदागी घेणारे कुठे आणी एकेकाळी देवासमोर कुठलेही मानधन न घेता ‘कला’ सादर करणारे कुठे?
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असे कलाकार आता शिल्लक असतील असे खेदाने म्हणावेसे वाटते.
एकदा सांगलीत मी गणपतीच्या मंदिरात गेलो असतानाचा एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. १५-२० वर्षे झाली असतील या घटनेला. वेळ साधारण ११ची. मंदिरात काहीच गर्दी नव्हती. दर्शन घेऊन, प्रदक्षिणा मारुन सभामंडपात बसे पर्यत एक गायक आपली पेटी काढून सूर लावण्यात मग्न होते. बरोबर साथीला एक तब्ब्लजी होते. ते ही हातोड्याने तबला, डग्गा सेट करण्यात मग्न. मग मी जरा थांबलो. विचार केला. एखादं गाणं तरी ऐकून जाऊ. थोड्यावेळानी त्यांनी जे गाणं ‘गणपती समोर सादर केलं ते गाणं होत ‘इंद्रायणी काठी’ शब्द कमी पडतील तो अनुभव सांगण्यासाठी. एखाद गाणं ऐकून अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय हे त्यावेळी मी अनुभवले. मूळ २-३ मिनीटाचे असलेले हे गाणे बुवांनी वेगवेगळे आलाप वगैरे घेऊन चागलं १० मिनिट रंगवल. काही खास जागा घेताना तब्ब्लजी कडे पाहून आणि त्यानंतर तब्ब्लजीकडून ही योग्य अभिप्राय मिळताच पुढे जात जात हा १० मिनिटाचा सोहळा असा काही रंगला की बस. गाणं संपलं. आता पुढचं गाणं ऐकून मगच निघायचे अशी मनाची तयारी झाली होती पण क्षणार्धात पेटी, तबला डग्गा गुंडाळून दोघेही मार्गस्थ झाले. पण ते गाणे मात्र माझ्या मनात कायमचे घर करुन गेले. जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा नकळत मी सांगलीच्या गणपती मंदिरात पोचलेलो असतो.
मंडळी आपण ही असे अनेक कलाकार देवळात आपली कला सादर करताना पाहिले असतीलच छान वाटतं ना असं काही पाहिलं की!
आपल्या पैकी आज अनेकजण वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. यानिमित्याने कलाकार मंडळींना अशी विनंती करावीशी वाटते की तुम्ही कलाकार म्हणून खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर या कलेच्या अधिपती जो गणपती आहे (६४ कलांचा अधिपती) त्याचा विसर न करता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्ह्या विनामोबदला आपली कला शक्यतो गणपतीच्या देवळात, गणेशा चरणी (किंवा इतर कुठल्याही देवळात) अर्पण करा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे चला.
पाश्च्यात्य विचार सरणीत यालाच Grattitude व्यक्त करणे असं काही तरी म्हणतात
मंडळी मी तर टुकार लेखक पडलो. लेखनाचे मानधन मिळणे वगैरे या गोष्टी तर केव्हाच इतिहासजमा झाल्यात. तरीपण जे काही थोडेबहुत लिहायला सुचले ते गणेश कृपेनेच.
‘सादर करतो कला गजमुखा’ या न्यायाने हे लेखन आज त्याच्याच चरणी आणी बुध्दीचा कारक ग्रह ‘बुध’ यालाही अर्पण करुन सध्या इथंच थांबतोय.
सादर करतो कला गजमुखा
रिध्दी सिद्धीच्या वरा
शुभारंभीया करितो तुजला
वंदन हे गजवरा
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com