श्री एस्.एन्. कुलकर्णी
☆ विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆
कुठे थांबायचे हे समजले पाहीजे”
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुठे थांबायचे हे समजले पाहीजे. हे जीवन जगण्याचे तत्वच आहे. हे कुठेही लागु होते.बर्याच जणांना समजत नाही म्हणा किंवा बर्याच जणांच्या लक्षांत येत नाही कुठे थांबायचे ते. ज्यावेळी लक्षांत येते त्यावेळी खुप ऊशिर झालेला असतो आणि नुकसानही खुप झालेले असते. तेंव्हा कुठे थांबायचे हे तत्व आपण सर्वांनी अंगिकारले पाहीजे.
आता पर्यावरणाचाच प्रश्र्न घ्या. आपण निसर्गावर अत्याचार करीत आलेलो आहे.त्याचा परिणाम पर्यावरणाचा र्हास होण्यात झालेला आहे. खरी जंगले न वाढवता आपण सिमेंटची जंगले वाढवित गेलो. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लोकांना श्र्वास घेणे अवघड होत चाललेले आहे.ही परिस्थिती बहुतेक सर्व मोठ्या शहरांमधुन आहे. विकास करीत असताना योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे ही परिस्थिती ऊदभवली.
कांहीवेळा आपल्याला प्रचंड राग येतो. रागाच्या भरात आपण खुप बोलतो असे नाही तर कांहीही बोलतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची की राग आला की १ ते १० अंक मोजायचे. हेतु हा की अंक मोजेपर्यंत राग थोडा तरी शांत होतो. रागाच्या भरात बोलताना कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलत सुटतो. अद्वातद्वा बोलतो. माणसे दुखावली जातात, दुरावली जातात. हे टाळले पाहीजे. राग आला की योग्य ठिकाणी थांबता आले पाहीजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतील.
अलिकडे असे लक्षांत आले आहे की तरूणपिढी व्यायाम, जीम याकडे अधिक लक्ष देत आहे. पण हे करीत असताना कुठे थांबायचे हे या तरूणपिढीला समजत नाही. अशा बातम्या वाचनात आल्या आहेत की व्यायाम करीत असताना कांही मुले अति व्यायामामुळे दगावली आहेत. तेंव्हा तरूण पिढीने व्यायाम करताना कुठे थांबायचे हे लक्षांत घेतले पाहीजे.
सध्या सर्वांकडे स्मार्ट फोनस आहेत. कंपन्याचे तीन तीन महीन्यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बोलण्याचे चार्जेस पडत नाहीत. अनेकजण त्यामुळे फोनवर बोलायला लागले की थांबतच नाहीत. तासन तास बोलत राहतात. या कालावधीत एखाद्याला यांचेशी संपर्क साधावयाचा असेल तर यांचा फोन बिझी. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे थांबायचे हे समजलेच पाहीजे.
अलिकडे सर्वांना “व्हाटसअॅप” हा फार मोठा विरूंगळा आहे. आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे.आपल्याकडील माहीतीसुध्दा आपण शेअर करू शकतो. पण कांहीजण याचा दुरूपयोग करतात. आला मेसेज की कर फॉरवर्ड. कांहीवेळा मेसेज वाचायचेसुध्दा कष्ट घेत नाहीत. एकाचवेळी वीस वीस तीस तीस फोटो, ६०/७० एमबीचे व्हीडीओज पाठविणे कितपत योग्य आहे. याचा विचार अतिशय आवश्यक आहे. पण तो होताना दिसत नाही. व्हाटसअॅपवरती मेसेजस पाठविताना कुठे थांबायचे हे समजले पाहीजे नाहीतर मेसेजेस डीलीट करण्याचे कामच होऊन जाते.
पुर्वी लग्नसभारंभात जेवणाच्या पंक्ति ऊठायच्या. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे प्रदर्शन व्हायचे. जेवताना पाहुणेमंडळीना प्रचंड आग्रह केला जायचा. अन्नाची नासाडी व्हायची. आग्रह करण्याला “कुठे थांबयचे” हे न समजल्यामुळे असे घडायचे. आता थोडी पध्दत बदलली आहे. पंक्तिच्याऐवजी बूफे पध्दत आली. तरीसुध्दा अन्न वाढुन घेताना काय काय घ्यायचे काती किती घ्यायचे हे न समजल्यामुळे अन्नाची नासाडी ही होतेच. फक्त प्रमाण थोडे कमी.
थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. म्हणतात ना अति तेथे माती. या लेखाचे सार हेच की कुठे थांबायचे हे आपल्याला समजले पाहीजे आणि हे समजले तर आपले सर्व नातेसंबंध नॉर्मल राहतील, सुधारतील.
मैत्रीत, नातेसंबंधात बर्याच वेळा चेष्टा केली जाते. जोपर्यंत मजेत चालले आहे तोपर्यंत ठीक वाटते. पण चेष्टेचा अतिरेक झाला की नातेसंबंध बिघडतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहीजेत.
© श्री एस्. एन्. कुलकर्णी
वारजे, पुणे-४११०५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈