सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  5 – राग~ देस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

सूर संगत या सदरांत गेले काही दिवस एकेका रागाविषयी लिहितांना माझ्या मनांत आले राग म्हणजे नक्की काय? तर त्याविषयी असे म्हणतां येईल की ज्याप्रमाणे मुलामुलींची विकास, रमेश, सुरेश किंवा पुष्पा, शुभदा, रेवती अशी वैयक्तिक ओळख पटण्यासाठी नावे ठेवण्यांत येतात त्याचप्रमाणे यमन, भूप, पुरिया, मारवा आणि बागेश्री, रागेश्री, कलावती अशी राग~रागिण्यांची नावे आहेत. बाकी प्रत्येकच राग शुद्ध व विकृत अशा एकूण बारा स्वरांतूनच तयार झाला आहे. शास्रानुसार वेगवेगळ्या प्रकारांची पांच ते सात स्वरांची रचना म्हणजे राग. त्याचबरोबर ‘रंजयति इति रागः’ अशी रागाची व्याख्या आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कशीही स्वररचना करा त्यांतून श्रोतृवृंदाचे मनोरंजन होणे महत्वाचे आहे.मग राग कोणताही का असेना!

राग देस हा त्याचपैकी एक! शास्रीय विवेचनानुसार सा रे म प नी सां/ सां नी (कोमल) ध प मग, रेग, सा असे आरोहांत ग व ध वर्ज्य आणि शुद्ध स्वर तसेच अवरोहांत कोमल नी व सातही स्वर असलेला ओडव संपूर्ण जातीचा

खमाज थाटोत्पन्न राग!साधारणपणे रात्रीच्या दुसर्‍या प्रहरांत हा राग सादर करायचा असतो, परंतु उपशास्रीय व सुगम संगीतांत ह्याचा जास्त वावर असल्यामुळे वेळेचे बंधन नाही. पंचम व रिषभ यांचा वारंवार प्रयोग होत असल्यामुळे या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे पंचम व रिषभच आहेत. त्यांतील रिषभ हे एक अजब रसायन आहे.मध्यमांतून गंधारमार्गे रिषभाकडे येतांना जी मींड आहे त्यांत देसचे सगळे सौंदर्य सामावलेले आहे. उदा. मsगरेगsसा. लहांनापासून मोठ्यांपर्यंत आणि नवशिक्यांपासून ते कसलेल्या गायकांपर्यंत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य ह्या देस रागांत आहे.

एखाद्या युवतीच्या गालावरील पडणार्‍या खळीमुळे जसे तिचे सौंदर्य खुलते तद्वतच सर्व शुद्ध स्वरांच्या विहारांत अवरोही रचनेत येणार्‍या कोमल निषादामुळे देस ऐकायला फार हळुवार आणि गोड वाटतो. पदांतील काव्यरचनेनुसार स्वररचना केली तर एकाचवेळी ईश्वरभक्ति, देशभक्ति, शृंगार अशी विविध भावनिर्मीति करणारा हा राग आहे.

गले भुजंग भस्म अंग यातला देस शंकर पार्वतीच्या प्रेमाचा आविष्कार दाखवितो. मुंबई दूरदर्शनने ‘देस राग’ ही धुन राष्ट्रीय एकात्मता दर्शविण्यासाठी तयार केली होती. वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत अनेकविध चालीत बांधले असले तरी मूळ देस रागातीलच वन्दे मातरम् सर्वमान्य आहे.

एकच प्याला नाटकांतील ‘प्रभू मजवरी कोपला’ हे सिंधूच्या तोंडचे पद करूण भावना व्यक्त करणारे आहे. किंवा विद्याहरण नाटकांतील ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ हे ही पद देसमधीलच ज्यांत आपल्याला शृंगार दिसतो. अगदी अलीकडील उदाहरणे द्यावयाची झाल्यास ‘कोई कहे कहता रहे’~ दिल चाहता है, ‘हर घडी बदल रही है रूप जिन्दगी’~कल हो ना हो ह्या चित्रपट गीतांचा उल्लेख करतां येईल.

शास्रीय संगीताच्या बैठकीत ठुमरी दादरा या स्वरूपांत हा राग अधिक सादर केला जातो.ख्याल किंवा धृपद गायकीत क्वचितच आढळतो.अपवाद म्हणून रोशनआरा बेगम, पं. रातंनजनकरबुवा, उल्हास कशाळकर यांनी बांधलेल्या’होरी खेलनको चले कन्हैया, ‘घन घन घन’ या देसमधील बंदिशी आज यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. शास्रीय अंगाने उपशास्रीय संगीताच्या आविष्काराला अनुकूल अशा मध्य व द्रृतलयीतील बंदिशी गायल्या जातात. माणिक वर्मांच्या एका मैफिलीत’हो श्याम मोरी बैंय्या गहो ना’ ही देसमधील द्रृत एकतालांतील बंदिश म्हणजे शास्रीय व उपशास्रीय शैलीचा बेमालूम मिलाफ होता असे म्हणतात.

शेवटी कलाकाराला हेच लक्षांत ठेवायचे असते की कोणताही राग घ्या, स्वरांशी कसरत करून आपले ज्ञान दाखवायचे नसते तर त्यांच्याशी लीलया खेळून रसिकांचे मन जिंकायचे असते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments