श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
सखी माझी तुळस
सखी माझी तुळशीमाई
तुला लाविते अंगणी!
रोज सकाळी नेमाने
घालिते गं तुला पाणी!!१!!
तिन्ही सांजेच्या वेळेला
दिवा तुला मी लाविते!
हळदीकुंकू वाहुनिया
औक्ष सर्वांना मागते !!२!!
दगडविटा आणुनिया
बांधिले मी वृंदावन!
अंगणात करिते रोज
रंगावली संमार्जन !!३!!
वृंदावनाच्या भोवती
बांधविला ओटा सुबक!
बसुनिया त्याच्यावरी
करिते मी हितगुज !!४!!
तुझ्या डोईवरल्या निळ्या
मोहकशा त्या मंजिऱ्या !
लेकीसुना नातीपणती
माझ्या साजिऱ्या गोजिऱ्या !!५!!
माझ्या सोनियाच्या घरा
तुझ्यामुळे आली शोभा!
बाळकृष्ण तुझा सखा
हाती मुरली पुढे उभा !!६!!
भरजरी मुकुटावरी
शोभे त्याच्या मोरपीस!
नाही आला मुरलीरव
होई जीव कासावीस !!७!!
दिनांक:-२७-११-२०.
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈