पुस्तकाचे नांव : तळातून वर येताना

लेखिका : श्री हणमंतराव जगदाळे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तळातून वर येताना” – श्री हणमंतराव जगदाळे ☆ 

संघर्षमय जीवनाची यशोगाथा– समिक्षक – श्री किशन द़ उगले 

ज्या ज्या कलाकृतीच्या मुळाशी मानवतावादी जाणिवांचा संघर्षाचा सामना निर्मळ अंत:प्रवाह झुळझुळतो आहे. जे साहित्य जननिष्ठ प्रतिभावंतांनी जनासाठी जनहितार्थ निर्माण केलेले आहे व ज्या साहित्याला जीवनाचे प्रेरणेचे आणि समस्यासंकटा निर्मूलनाचे अधिष्ठान आणि कलात्मक सौंदर्यांचे भान आहे ते सर्वच हितैशी सृजन म्हणजे अक्षर साहित्य व तेच निखळ जन साहित्य होय, प्रस्तूत ‘तळातून वर येताना’ या आत्मकथनात वास्तवतेने मांडलेले, केलेले कार्य याचा जन्मापासून ते स्वेच्छा सेवानिवृत्ती पर्यंतचा मागोवा घेतलेला दिसून येतो. शौर्यत्व गाजविणे व साहित्य लेखन ही सातारा इथल्या मातीची निर्मिती आहे. पोलीस या विषेशनातूनच या साहित्य कार्याचा समाजजिवनाशी असलेला दृढ संबंध स्पष्ट होतो. ग्रामीण व शहरी यांच्या जिवनातील प्रसंग व त्यांना तोंड देणे, सुख दुःखे त्यातील सुक्ष्मातीसुक्ष्म छटा अधोरेखित करणारे हे वास्तवदर्शी, त्यातून साकारणारी पोलीस संस्कृती, याचे चित्र आपल्या पुढे साकार करते. जनसंस्कृतीच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ जे साहित्य निर्माण होतं तेच खरं जनसाहित्य होय. शुभमुल्यांच्या कार्याच्या रक्षणार्थ अशुभाशी, अमंगलाशी संघर्ष करायला सिद्ध होणारे हणमंतराव जगदाळे वाचकांच्या मनात घर करून बसतात.

पालकांच्या कणखर, दणकट,  महत्त्वकांक्षी , बळकट बोटाच्या आधारे जिवनाचे सोने होणे, विविध अनुभव इतरांच्या मदतीवर मोठे होणे, ‘अस्वस्थ अधांतर’ मधून एका मागासवर्गीय मित्राकडून (दिनकर) पाच रू. मदत ही जिवनाचे सुवर्णकाळ बनविते. फौजदार होणे, एका डोळ्यात आसू तर दुसर्‍या डोळ्यात हसू असा संगम घडलेला दिसतो. लेखक पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ या तत्वाशी एकनिष्ठ असल्याने माणसे जोडणे, मदत करणे, आनंद वाटणे, बापुचा वारसा चालविणे या गोष्टी जाणिवपुर्वक मांडलेल्या आहेत. पाहिल्या केसचा आनंद, शरदला मदत करणे, पंढरपूर पोलीस स्टेशनमधील अनुभव, मंद्रुप पो. स्टेशनातील अनुभव , हिंदमाता खाणावळ, सोलापूर शहर चावडी पो. स्टेशनातील प्रसंग सावित्रीबाई बरोबर संसार सुख, तिकीटाचा काळाबाजार यासाठी करावी लागणारी कसरत उल्लेखनीय वाटते. स्त्रिविषयक आपुलकी, स्त्रियांचे उपदेश, मुलांचा जन्म, कराड पोलीस स्टेशनमधील घटना सी.आय.डी. मधील कार्य, कृष्णाकाठचे कुंडलला जाण्याचे वास्तव चित्रण,  भांडणे मिटवणे, तुटणारा संसार  जोडणे, या कार्यामुळे लोकप्रियता प्राप्त झालेली दिसून येते. लोक पुरस्काराचे मानकरी, ‘व्यवस्थापन पंढरीच्या वारीचे’ यामधे वारीचे सुख, पालखी सोहळ्याचा आनंद, चोख बंदोबस्त याचे यथार्थ वर्णन केलेले दृग्गोचर होते.  अहमदनगरमधील दारूमुक्ती ही अविस्मरणीय घटना वाटते. स्त्रियांच्या कल्याणासाठी केलेला एल्गार खऱ्या अर्थाने जगविण्याचा मानस होता. विश्वास नांगरे पाटील यांच्या सानिध्यातून कार्यप्रणालीची पताका फडकली. जालना येथील सहाय्यक आयुक्त असताना पाणीटंचाईचा प्रसंग मनाला खंत वाढवितो.

हणमंतराव जगदाळे सर हे नोकरीला देव मानणारे. प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत.

लोकांची सेवा हीच आशिर्वादाची शिदोरी मानून कार्य केले. नैसर्गिक जगणे, महाराष्ट्रातील अती संवेदनशील जुन्नर गावात एकोपा निर्माण करणे, ‘पोलीस मेगासीटी ‘ ला कायदेशीर स्वरूप देणे, गोळीबारात झालेल्या मयताची कबुली देणे, समाजात स्वार्थांधता वाढीस लागणे, राजकीय लोक भ्रष्टाचारी असतात यावर प्रचंड विश्वास,  पोलीस खात्याविषयी नाराजी व हे खाते नावापुरतेच राहील , जनतेचा भ्रमनिरास करतील ही भविष्यवाणी सत्यात उतरत आहे याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना दिसतात. भविष्याचा वेध सांगताना, विचार मांडताना आपल्याच  अवतीभवती घडणारी/घडलेली वास्तवाधिष्ठित घटना प्रसंगाची कलात्मक गुंफण आहे. असा प्रत्यय आत्मकथन वाचकाला येतो.

या आत्मकथनकाराची आत्मनिष्ठा ग्रामजनाकडे वळलेली स्पष्ट दिसून येते. मानवी जिवनावर, त्यांच्या दुःखावर, त्यांच्या व्यथांकित जगण्यावर, अगतिक, असहाय्य परिस्थिती शरण न होता आत्मविश्वासपुर्वक धडपडण्यावर लेखकाची निष्ठा आहे. त्यामुळे माणुसपणावर त्यांची निष्ठा आहे. या कथनकातील घटकांचा मेळ मनात विलक्षण व्याकुळता व प्रेरणा उत्पन्न करतो. सार्वत्रिक आव्हान क्षमतेच्या कसोटीवर एक जिवनाभिमुख अनुभवाची कलाकृती म्हणून ‘तळातून वर येताना ‘ यशस्वी ठरली आहे. अत्यंत सुबोध, सरळ, अनलंकृत अशी भाषाशैली आत्मकथनातून अनुभवायला मिळते. जगदाळे सरांच्या लेखणीतील साधेपणाने या आत्मकथनाला विलक्षण सौंदर्य आणि सामर्थ्य प्रधान केले आहे. कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसलेला निसर्गावर , कार्यावर निखळ स्वरूपातील शुद्ध कर्म संस्कृती वर लेखकाची निष्ठा आहे. समाजातील अपराधी , अन्यायी व्यक्तीच्या मानसिक क्रिया, प्रतिक्रियांचा अर्थपूर्ण शोध या आत्मकथनात आलेला दिसून येतो. त्यामुळे यास सच्चा आत्माविष्कार करते. हे एक उत्तम प्रेरणादायी, अर्थसंपन्न, बहुआयामी कलाकृती आहे. वैयक्तिक नेणिवेकडून सामुहिक नेणिवेकडे झालेला लेखकाचा संघर्ष व भाव प्रवास यामध्ये दिसतो! ‘संघर्ष संवाद’ हे या कलाकृतीचे प्राणतत्व होय. तसेच एक समर्थ आशयसंपन्न लेखन कृती असून मनोविश्लेषणाला प्राधान्य देणारी व पोलीस जिवनाचे दर्शन घडविणारी रेखीव आत्मकथन आहे. आशयाची व्यापकता ही केवळ पोलीस जाणीवेपुरतीच मर्यादित नसून आखिल मानवतेला सामावून घेणारी व वाचकांना विचारांची नवी दिशा देणारी आहे. वाचकाच्या मनात प्रचलित समाजव्यवस्था, राजकारण, सोसायट्या, अन्याय, छ्ळ, भ्रष्टाचार इत्यादी विषयी चीड निर्माण करणारी व त्याला परिवर्तन सन्मुख करू पाहणारी कलाकृती आहे. तसेच अशा या सर्व भ्रष्ट, स्वार्थांध, शोषक, किळसवाण्या वातावरणाला समर्थपणे शह देणे केवळ तरुण पिढीलाच शक्य आहे. तेव्हा या नव्या सर्जनोत्सुक पिढीमध्ये. क्षमता वादातीत आहे. जनकल्याणासाठी शुभमुल्याचा उद्घोष करणारी व मंगल, सुंदर, पवित्र विचारावर वाचकांना सुद्धा ठेवायला लावणारी ही जनसंस्कृतीची समृद्धी साधणारी असाधारण अशी कलाकृती आहे. म्हणूनच ती श्रेष्ठ जन आत्मकथन आहे असे गौरवाने म्हणावे लागते. येथील भावनार्थयुक्त प्रतिमा त्याच जिवनाशयातून प्रस्फुरित झालेल्या आहेत. उरबडवेपणा, नटवेपणा या प्राथमिकतेतील दोषांतून हे कथन खूप दूर आहे. जीवन दर्शनातली मुल्ये गर्भता परिवर्तनाच्या असोशीने सहजतेने विश्लेषीत होत जाते. पोलीस जीवनाशी एकरुपलेली विविध रुपे सरसोत्कट वाटतात. आशयानुकुल प्रतिमा रुपबंधातली सहजता, कथनातील प्रभावीपणा,  शैलीची जननिष्ठ वास्तवता, पोलीस मुल्यांच्या आत्मीयतापुर्ण, सहजाविष्कार व एकूणच कथेची व्याप्ती आणि परिणिती यांचे जननिष्ठेत झालेले विसर्जन कथेला वास्तवतेबरोबर आव्हान क्षमता बहाल करून जातात. त्यात शैलीचा साधेपणा, निरागस, सत्यकथन जिवन संघर्षाकडे पाहण्याची प्रगाढ जाणीव दिसून येते. साध्या भाषेने धारण केलेली अंर्तलय,  अनुभुतीचा अस्सलपणा, स्वजाणिवेच्या पलीकडे जाणारी व्यापक कार्य पोलीस निष्ठा धारण केलेली कर्तव्ये, संघर्ष जाणीव यामुळे जगदाळे सरांचे कार्य स्वत्वाच्या पलीकडे जाऊन सर्व थरातील वाचकांना आव्हान करते.

आस्वादकांच्या भुमिकेतून त्यांची महात्मता  जनप्रर्वतन क्षमता तपासताना प्रगाढता, व्यापकता, अर्थपुर्ण संदेश व जनसंस्कृतीस त्या कलाकृतीने दिलेले योगदान विचारात घेतले जाते. १९७६ ते २०१२ या काळात अत्यंत वेगाने, प्रामाणिकपणे, तडफदारपणे, नेकीने केलेले कार्य अतिशय संघर्ष आणि धडपडमय झाले आहे. नावलौकिक, सहकाऱ्याचे प्रेम, आदर, जिव्हाळा संपादून, घरदार विसरून केलेली पोलीस सेवा ही सर्वांनाच डोळ्यात अंजन  घालणारी आहे. जगदाळेसाहेबांनी सहज, सरळ जे घडले आहे ते सत्यात उतरविले आहे. पराक्रमाविषयी बढाई , शाबासकी घेणे, प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे  लागणे, स्तुती सुमनांचा वर्षाव करून घेणे यापासून खूप दूर राहिले आहेत. जिवाची पर्वा न करता कौटुंबिक सुखाचा त्याग करणे व कर्तव्य पुर्ण करणे या गोष्टी जगदाळे सरांनी निष्ठा ठेवून नोकरी हीच ईश्वर भक्ती, देशसेवा व्रत धारण केलेले दिसून येतात. सहनशिल सहिष्णुता, मन विचलित न होणे, तहान भूक विसरणे, विश्रांतीला दूर ठेवणे अशा अनेक मुल्यांची जोपासना उद्गित झालेली आहे. त्यामुळे वाचकाला अंतर्मुखी समाधान मिळून जगण्याचे बळ , सेवेची ऊर्जा, कर्तव्याला वंगन प्रेरणा मिळते.

भ्रष्टाचारास थारा न देणे, कष्टाबद्दल रडगाणे न गाणे, यशाची गर्वोवृत्ती नको, अशा अनेक नवनिर्मितीच्या खुणा तसेच कर्तव्यदक्षतेची सुगंधी दखल, कष्टाची निखळ पखरण अनुभवणे याचा परिपोष हिरवळी सारखा पसरतो व समाजाला आदर्श जीवन प्रणालीची दिशा मिळते. म्हणून पोलिस अधिकाऱ्यानेच नव्हे तर समाजातील सर्वानी वाचावे, अभ्यासावे असे हे आत्मकथन स्पृहणीय आहे. अभिनंदनिय संग्राह्य असावे म्हणूनच विद्यापिठाने अभ्यासासाठी नेमावे. तसेच या आत्मकथनात चैतन्यपुर्ण अशी स्वयंपुर्णता व इतर अनुभवापेक्षा व्युहात्मक वेगळेपण आलेले आहे. आस्वादकाला त्यामुळे अनुभव चैतन्य लाभून जीवन जगण्याची स्फुर्ती मिळते. अनुभुतीची अभिव्यक्ती सफल झाल्याने वाचकालाही ती समृद्ध अनुभुती प्राप्त होते. त्यामुळे अनुभव आत्मकथनाचे आस्तित्व फलद्रुप झालेले दिसून येते. प्रत्यक्षात अनुभव, संघर्ष, त्याग, मुल्य व भविष्याचा वेध मांडलेला आलेख म्हणजे ‘तळातून वर येताना’ हे आत्मकथन होय. अशीच साहित्यनिर्मिती फळास यावी अशी अपेक्षा यासाठी पुढील साहित्य लेखनास हार्दीक शुभेच्छा.

शेवटी.

॥ इवलेसे रोप लाविले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी ॥

समीक्षक

श्री किसन दत्तात्रय उगले, (महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई), ता. उदगीर . जि. लातूर – ४१३५१७

मो. 9850251540

लेखक

श्री हणमंतराव जगदाळे,  (निवृत्त पोलीस उपअधीक्षक )

प्रकाशक

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

२५१ क, शनिवार पेठ , पुणे. पीन -४११०३०

फोन -०२० २४४७१७२३/२४४८३९९५ .

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments