सौ. दीपा नारायण पुजारी 

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग तिसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

तरीही एक शंका होतीच.

“मावशी तुम्ही तुमच्या घरात का नाही गेलात मग?”

“तो भुतांच्या राज्यातला नियम आहे .आम्ही आमच्या खर्‍या घरात राहू शकत नाही .तुझ्या  बागेतील  चाफ्याच्या झाडावर राहतेय मी. बकेट लिस्ट नं. एक”

बकूमावशींना जगण्याचा केव्हढा सोस!  हं—–

“हे बघ, जा झोप आता. उद्या जोशांच्या कडं डबा द्यायचाय़ ना? पोळी भाजी चा? मला हे आवडलं हं तुझं. सगळ्यांना मदत करतेस. जोशी काकू  होम क्वारंटाईन आहेत म्हणे”.

मी पुन्हा अचंबित !

“गं हे वरदानच आहे . मनकवड्या असतो आम्ही . . . . . . ‘भूतबायका हं!’ (भुताटकिणी नव्हे)

. . . . . सकाळी सहाचा गजर वाजला. मी धडपडतच ऊठले.केसांना बो बांधून पदर खोचतच ओट्याकडे धावले आणी . . . . . थिजून ऊभीच राहिले.माझा डोळ्यावर विश्वासच बसेना !! पोळी भाजी तैयार!! डब्बेही भरून ठेवलेले. गॅसवर चहाचं आधण ठेवताना मी हळूच चाफ्याच्या झाडाकडं बघीतलं. बकूमावशी हसत होत्या फांदीवर बसून, केसात चाफ्याची फुलं घालून. मी वासूला चाफ्याची फुलं काढायला पाठवलं.तो काही मिनिटातच हाका मारत आला टोपली  s s s भर s s फुलं घेऊन !

“सुधा~ अगं सुधा ~~ आज जादू झाल्या सारखी फुलं टोपलीत पडली बघ ! आकड्याची काठी फुलाकडे नेण्याचीच खोटी फूल खालीच!.”

मी झाडाकडं पाहिलं. मावशी पाय हलवत फांदीवर. गालातल्या गालात हसत.हातात कप.

त्यांनी मला डोळा मारला. (कसंतरीच झालंहो. .

वासूनं सुध्दा कधी डोळा नाही मारला हो.~~)

हु~श्श~ वासूला त्या दिसल्या नाहीत तर!

आज सगळी कामे पटापट होत होती मुळ्ळीसुध्दा दमणूक झाली नाही .धावपळ तर नाहीच नाही. मावशी होत्या ना मदतीला. मनात एक विचार येऊन गेला. . नकोच त्यांचा नंबर लागायला. राहूदेत माझ्याकडंच. पण बाई मी मनातल्यामनात जीभ चावली. एकदा तर बाई फजिती होता होता वाचले. तर काय झाले . . .

मी हॉलची सफाई करत होते .मावशींनी माझ्या कडून झाडू काढून घेतला. त्या पटापट हॉल मध्ये झाडू मारू लागल्या. आबा आले की तेव्हढ्यात काठी टेकत टेकत. “अगं सुधा, जरा तो टी. व्ही. लाव बरं . मला कोरोनाच्या बातम्या ऐकायच्यात.मुंबईत unlock आणी पुण्यात lockdown असं काहीतरी वासू सांगत होता .”

मी T.V. कडे वळणार तोच आबांची काठी पडल्याचा आवाज आला. मावशींनी त्यांना मागच्या मागे अलगद पकडलं म्हणून बरं बाई!

‘रामा! शिवा!गोविंदा!!’ मी कपाळाला हात लावला.आबा बोलत बोलत हॉलमध्ये आले. त्यांना फक्त हलणारा झाडू दिसला बहुधा.मावशी कशा दिसणार ?त्यांना घाम फुटला होता. मावशींच्या मदतीनंच मी त्यांना खुर्चीत बसवलं.मावशी पाण्याचा ग्लास घेऊन येतच होत्या . . . . तेव्हढ्यात ‘सुधा , कसला आवा. . ‘ वासूची एंट्री झालीच. पटकन ग्लास हिसकावून घेतला. बापरे ! वासूला तरंगत येणारा ग्लास  दिसला तर नसेल? तर्रि बर्र . र्र. . . आबांना सावरण्याच्या गडबडीत दुसरं काही बोलणं शक्यच नव्हतं. घामानं डबडबलेल्या मला बघून त्याला वाटले आबांच्या तब्बेतीचं दडपण

आलेय ! मावशी केंव्हाच पसार झाल्या होत्या.

आबा सावध झालेले बघून मी मागच्या पावलीच आत खोलीत पळाले आणी धपकन् बेडवर बसले. बसले कसली आदळलेच!! परिस्थिती ओळखून वासूनं छानसा चहा करून आणला.

“घाबरतेस काय अशी? B.P. ची गोळी घेतली नाहिये ,त्यामुळे चक्कर आली असेल.घे चहा घे,  विश्रांती घे थोडी बरं वाटेल.”

“आबांना देतो मी चहा बिस्किटं.गोळी ही देतो. तू आराम कर.”असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला.या सगळ्या गोंधळात मावशींचे दुपारच्या जेवणाचं ताट करायलाच विसरले. पण भांड्यात ताटं मात्र चार पडली होती ? मलाच नाही कळलं तिथं त्या दोघांना काय कळणार म्हणा?

क्रमश: ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments