सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
मागच्या भागात सांगितलेल्या पौराणिक कथेनुसार जे सहा राग पहिल्यांदा उत्पन्न झाले त्या मुख्य सहा रागांच्या प्रत्येकी सहा किंवा पाच (याबबत प्राचीन ग्रंथकारांच्या मतांमधे भिन्नता आढळते) रागिण्या आणि पुढं प्रत्येक रागिणीचे पुत्रराग व पुत्रवधू राग अशी ‘राग-वर्गीकरण’ पद्धती प्राचीन ग्रंथांत आढळून येते. त्याकाळी ती प्रचलितही होती. मात्र, ह्या कल्पनेला काहीही वैज्ञानिक, शास्त्रीय आधार नसल्याने ती लोप पावत जात पुढे इतर रागवर्गीकरण पद्धती अस्तित्वात आल्या. त्या सहा मुख्य रागांपैकी ज्या भैरव रागाची माहिती आपण मागच्या भागात घेतली त्याची एक रागिणी म्हणजे ‘भैरवी’!
‘भैरवी’ हा दहा थाटांमधील हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे हा राग भैरवी थाटाचा आश्रयराग आहे. भैरवी हे नाव प्रत्येकाच्याच परिचयाचे असते. कारण कुठल्याही मैफिलीची सांगता ही भैरवीमधील रचना गाऊन करायची अशी एक पद्धती आपल्याकडे रूढ झाली आहे. त्यामुळे कधी इतर एखाद्या कंटाळवाण्या व्याख्यान/प्रवचनात किंवा अगदी गंमतीत घरी बोलत असतानाही बोलणं ‘आवरतं’ घ्या हे सूचित करण्यासाठी आता ‘भैरवी घ्या’ असं म्हटलं जातं, कारण भैरवी म्हणजे ‘सांगता’ ही सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या किंवा न जाणणाऱ्या सगळ्यांचाच एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्याकडे ‘भैरवी कोणती गायली?’ हा उत्सुक प्रश्न असतोच.
खरंतर उत्तर भारतीय हिंदुस्थानी संगीत पद्धतीत कोणताही राग गाण्याची शास्त्राधारित वेळ ठरलेली आहे. त्यानुसार भैरवी हा प्रात:कालीन राग आहे. मग कोणत्याही वेळी होणाऱ्या मैफिलीची सांगता भैरवीने करायची ही प्रथा रूढ होण्यामागे काय कारण असावं? तर काही गुणी अभ्यासू व्यक्तींच्या मते काही प्रथा ह्या ‘समाजमान्यतेतून निर्माण होतात. भैरवी हा राग लोकांना इतका भावला असेल कि प्रत्येक मैफिलीमधे तो ऐकायला मिळावा असे वाटू लागले असेल, गायकालाही भैरवी गायल्यानंतर परिपूर्णतेची अनुभूती येत असेल आणि त्यातूनच मग हा पायंडा पडत गेला असावा.
भैरवी रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात आरामशीर ख्यालगायन आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी संपूर्ण शास्त्रीय गायनाची मैफील असेल तेव्हांही सांगतेला भैरवीतली एखादी उपशास्त्रीय रचना किंवा भैरवीतला छोटा ख्याल व तराणा, बंदिश कि ठुमरी असं काहीतरी गायलं जातं. मात्र ठुमरी, टप्पा, गझल इ. उपशात्रीय प्रकारांमधे, सुगम संगीतामधे ह्या रागाचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात पूर्ण बारा स्वरांचा वापर केला जातो. खरंतर रागात म्हणण्यापेक्षा ह्या रागाधारित रचना करताना किंवा रचनांना विस्तार करताना असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. अर्थातच उपशास्त्रीय रचनांमधे रागाचे नियम पाळण्याचे बंधन नसतेच. मात्र ह्या रागात इतर सर्वच स्वरांचा वापर खुलूनही दिसतो. परंतू, जेव्हां एखादी रचना भैरवी रागाची ‘बंदिश’ म्हणून प्रस्तुत केली जात असेल तेव्हां मात्र रागनियम पाळावेच लागतात. इतर स्वरांपैकी फक्त शुद्ध रे चा आरोही वापर हा बंदिशींमधेच दिसून येतो तेवढाच!
भैरवी थाटाचे सर्व सूर ह्या रागाच्या आरोह-अवरोहात आहेत. म्हणजे सर्व सात सूर आहेतच मात्र त्यांत रे , ग, ध, नि हे चारही स्वर कोमल आहेत. ह्या रागाच्या वादी-संवादी स्वरांविषयी मतभिन्नता आहे. काहीजण ते अनुक्रमे म व सा तर काहीजण ध व ग असल्याचे मानतात. संपूर्ण सातही स्वरांचा वापर झाल्याने रागाची जाती ही ‘संपूर्ण’ आहे. समाजमान्य प्रथेनुसार हा सर्वकालीन राग मानला गेला असला तरी शास्त्रानुसार तो प्रात:कालीन राग आहे.
मात्र सगळ्या व्याकरणीय गोष्टींच्या पलीकडे जाऊन भैरवी अनुभवताना आपण स्वत:ला विसरून एका वेगळ्याच विश्वात पोहोचतो. ही भैरवी अंत:चक्षूंना ‘पैलतीर’ दाखवते किंवा अंतर्मनाला ती जाणीव करून देते असं मला वाटतं. गुणी गायकाची संपूर्ण सर्वांगसुंदर मैफिल ऐकल्यावरही परमानंदाच्या उच्च शिखरावर नेणारी भैरवी म्हणूनच कदाचित सर्वांनाच हवीहवीशी!
किशोरी ताईंचं ‘अवघा रंग एक झाला’, भीमसेनजींचं ‘जो भजे हरी को सदा’, जसराजजींचं ‘निरंजनी नारायणी’, अभिषेकी बुवांचं ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ह्या रचनांचं स्मरण झालं तरी श्वासांतलं चैतन्य जाणवून अंगावर रोमांच उभे राहातात…. त्या जणू कैवल्याचं चांदणंच वाटतात! ह्या रागातल्या किती रचना सांगाव्या…!
अगा वैकुंठीच्या राया, प्रभु अजि गमला, बोला अमृत बोला, तम निशेचा स्मरला, सुकतातची जगी या अशी कित्येक नाट्यपदं भवानी दयानी, जे का रंजले गांजले, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, जातो माघारी पंढरीनाथा, जनी नामयाची रंगली कीर्तनी, अजि सोनियाचा दिनु, गा बाळांनो श्री रामायण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा कित्येक भक्तिरचना, असेन मी नसेन मी, एकाच जा जन्मी जणू, रंगरेखा घेऊनी मी, आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे अशी कित्येक भावगीतं, खुलविते मेंदी माझासारखी लावणी, झुकझुकझुकझुक अगीनगाडी सारखं बालगीत अशा सगळ्याच रचनांमधे भैरवी खुलली आहे… अर्थातच राग भैरवीतल्या स्वरांसोबत इतरही स्वरांचा वापर करून!
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आसावरी ,
भैरवी रागाबद्दलची खूप विस्तृत व छान माहिती वाचकांना मिळाली. धन्यवाद ..
तुमच्या या सांगीतिक सदराची आह्मी नेहमी प्रतीक्षा करीत असतो…