सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आपल्या  आजूबाजूला  अनेक  सजीव  हालचाल  करताना  दिसतात . काही  डोळयांना  सहज दिसतात  तर काहींच निरीक्षण  सूक्ष्मदर्शक  वापरुन  करावं  लागतं . ऋतुप्रमाणं या जीवांच्या  संख्येत बदल होताना दिसतो. काही किटक कोणत्याही हवामानात तग धरून राहतात. काही किटक मात्र ठराविक हवामानातच जिवंत राहू शकतात.

सुरवंट या किटकाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात रुपांतर होतं. मध चाखायला येणारी मधमाशी, रेशीम देणारे रेशमाचे किडे, शाई बनवण्याच्या कामात उपयोगी पडणारा लाखेचा किडा, परागीकरण करणारे किटक  असे माणसाला उपयोगी पडणारे किटक आहेत.

निसर्गानं माणसाला प्राणी आणि त्यांच्या पासून मिळणाऱ्या गोष्टींच्या रुपात एक अनमोल खजिना दिला आहे. प्राण्यांच्या विचित्र, विलक्षण आणि गुंतागुंतीच्या वर्तणुकीमुळं मानवाला त्यांच्या बद्दल नेहमीच एक औत्सुक्य वाटत आलं आहे. लाखेच्या किड्यानही मानवाचं कुतूहल असंच जागृत केलं.

लाखेचा वापर भारतात अगदी महाभारताच्या काळापासून होत आलेला दिसतो. कौरवांनी कुंतीसह पांडवांना जाळण्यासाठी लाखेचा महाल म्हणजेच लाक्षागृह बांधल्याची नोंद महाभारतात आढळते. अथर्ववेदातही लाखेचा उल्लेख आढळतो. यावरून पुरातन काळी हिंदूंना लाख आणि तिच्या उपयोगा विषयीची माहिती होती हे लक्षात येते.

इ.स. पू. बाराशेच्या सुमारास भारतात लाखेपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जात असा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकातही व्यापाऱ्यांनी लाखेचं रंजकद्रव्य आणि शेलॅक (पत्रीच्या स्वरुपातील लाख ) ही उत्पादनं युरोपीय बाजारपेठेत नेली.

लाखेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास मात्र बराच ऊशीरा सुरु झाल्याचे लक्षात येते. 1709 मध्ये फादर टाकार्ड यांनी लाखेच्या किड्याचा शोध लावला. 1782 मध्ये केर्र या शास्त्रज्ञानं प्रथम  कोकस लॅका असं नामकरण केलं. इतर  काही  शास्त्रज्ञांनी  ते मान्यही केलं . परंतु  नंतर  एकोणीसशे बावीस  मध्ये श्री . ग्रीन आणि  एकोणीसशे पंधरा मध्ये श्री. चॅटर्जी यांनी  या किड्याला टॅकार्डिया लॅका असं  नाव दिलं. फादर टाकार्डा यांच्या नावावरून टॅकार्डिया आणि  केर्र यांनी  दिलेल्या  नावावरून  लॅका. मंडळी, बघा बरं   “नावात काय नाही ?” नामकरणाची ही पध्दत मोठी  मजेशीर आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मानही झाला आणि  कोणीही  इतिहासाच्या पानावरुन पुसलं गेलं नाही.

लाख  किडा अनेक झाडांवर तसेच  झुडुपांवर आढळतो. किंबहुना या झाडांवर  परजिवी ( parasite ) म्हणून राहतो. म्हणजे या झाडांच्या खोडातील रस शोषून तो आपली उपजीविका करतो. जसं . . . कुसुम, पळस ,  बेर  ,बाबुळ ,खैर अरहर  इत्यादी .

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments