प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ घरोघर ईश्वर… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
कुंदकळ्या सांडती मुखातून, जेंव्हा बोलते लेक
लडिवाळ किती तीअसते पहा, नजरेची तिच्या ती फेक..
डाळिंबाचे दाणे दात हो, नजरेतून ती सुमने
पाहता क्षणीच जिंकून घेते, साऱ्यांचीच ती मने..
आभाळातील जणू चांदणी, उतरून येते घरी
निळ्या नभातील चंद्रकोर ती, कोमल सुंदर परी
मायेचे ते कोंदण असते, भरजरी रेशमी शाल
जणू लक्षुमी घराघरातील, करते मालामाल…
नक्षत्रे नि तारे सारे, तिच्या पुढे हो लटके
छुन छुन पायी चाळ वाजवत,पहा कशी ती मटके
आनंदाचा असतो ठेवा, प्रसन्न असतो वारा
सुगंधित ती करून टाकते, घर नि परिसर सारा…
बागडते नाचते नि गाते, बनून जाते माय
जणू तापल्या दुधावरील ती, स्निग्ध मायाळू साय
लळा लावूनी जाते निघूनी, सावरण्या परघर
तुटत नाही माया तरीही, जरी राहते दूर….
जीव गुंततो माहेरी पण, गृहलक्ष्मी सासरची
प्रतीमाता ती … पाठवतो हो …
घरोघर ईश्वर …ती …
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि:१४/०९/२०२०, वेळ:सकाळी :०९:४३
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈