श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ रक्षक–भक्षक (मूळ कथा – रक्षक-भक्षक) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सरहद्दीवरच्या रात्री आपल्या सोबत दररोज एक नवी गोष्ट घेऊन यतात.  धडधड वाढवणार्‍या, श्वास रोखायला लावणार्‍या या रात्री अनेकदा आयुष्यापेक्षा लांबलचक वाटू लागतात. इतक्या लांबलचक की सकाळ होता होता वाटतं, एक शतक उलटलय. कसरती करणार्‍या या रात्रींमुळे वाढणारी धडधड मोजण्याचं काही यंत्र बनलेलं नाही. जगातील सर्वश्रेष्ठ ईसीजी मशीनदेखील या रात्रीतील धडधड मोजायला आलं, तर या रात्रींपुढे शरणागती पत्करेल.

त्या दिवशीची सरहद्दीजवळची ती रात्र, एक विलक्षण गोष्ट आपल्याबरोबर घेऊन आली होती. सरहद्दीजवळील, उत्तुंग पहाडावर असलेल्या सीमारक्षकांच्या बंकरचा, संध्येने एवढ्यातच निरोप घेतला होता. बंकर अपादमस्तक बर्फात बुडून गेला होता जसा काही. या असल्या बर्फाळ पहाडांवर लवकर येण्याची, या निर्लज्ज रात्रीला जरा घाईच असते. सतत बर्फवृष्टी होत असलेला हा तिसरा महिना होता. खालून येणारे सगळे रस्ते गेल्या पाच महिन्यांपासून बंद होते. डब्यातील फ्रोजन भाज्या खाऊन आणि पावडरच्या दुधाचा चहा पिऊन तिथल्या सगळ्या लोकांच्या स्वाद-ग्रंथी विटून गेल्या होत्या पण जोपर्यंत बर्फ पूर्णपणे वितळत नाही, तोपर्यंत आणखी दोन-अडीच महीने हे असंच चालू रहाणार होतं. त्या रात्री, बर्फाच्या शुभ्र चादरीवर उठलेल्या दाट धुळीने रात्रीचा थोडासा पडदा उचलला गेला आणि उड्या मारत मारत एक मध्यम बांध्याचा हरण- शावक भय आणि आतंकाची नवी परिभाषा लिहीत, एका बांकरमध्ये येऊन लपून बसला. रात्रीची बेलगाम धडधड त्या शावकाच्या मोठ्या मोठ्या घाबरलेल्या डोळ्यात विक्राळ नृत्य करत होती.

सरहद्दीच्या त्या बाजूला, दुश्मनांच्या बाजूला एक दाट जंगल आहे. त्यातून या बाजूला वन्य प्राण्यांची ये-जा नेहमी दृष्टीपथात येते. बंकरमधील तत्पर, तरतरीत रखवालदाराने जेव्हा भयग्रस्त झालेल्या त्या शावकाला आत येऊन बंकरच्या एका कोपर्‍यात आश्रय घेताना पाहिलं, तेव्हा या गोष्टीचा छ्डा लावणं योग्यच होतं. जेव्हा त्या रखवालदाराला नियंत्रण रेषेपालीकडे  २-३ चित्त्यांची एक टोळी भटकताना दिसली, तेव्हा सगळी वस्तुस्थिती स्पष्ट झाली. सरहद्दीवर लावलेल्या काटेरी कुंपणापलिकडेकडे ते हळू हळू गुरगुरत होते. पांढर्‍या शुभ्र बर्फावर त्यांच्या पावलांच्या उमटलेल्या खुणा त्यांना पडलेला पेच स्पष्ट करत होता. आपल्या आहारावरचा अधिकार मिळवण्यासाठी रायफल घेतलेल्या रखवालदाराशी भिडणं ठीक होईल की नाही, असा पेच त्यांना पडला असावा. चित्त्यांच्या टोळीच्या बाजूने थोडीशी गंभीर  गुरगुर आणि पहारेकर्‍यांच्या बाजूने हाट.. हाट .. हुश.. हुश… या बरोबरच बर्फाचे गोळे करून त्यांच्यावर फेकणं, यामुळे चित्त्यांच्या टोळीने आपल्या आहाराच्या मागे लागण्याचा विचार सोडून दिला आणि ते खालच्या, दुश्मनांच्या बाजूच्या जंगलात पळाले. इकडे बंकरच्या कोपर्‍यात आखडून बसलेलं शावक, आपल्या फुंकणीसारख्या वर-खाली होणार्‍या श्वासांवर नियंत्रण मिळवत जगभराची शांती आपल्या मोठमोठ्या डोळ्यात सामावून घेत होतं. त्याला हे कुठे माहीत होतं की त्याचे रक्षक असलेले रखवालदार, गेल्या ३-४ महिन्यांच्या बर्फवृष्टीमुळे बंद झालेल्या रस्त्यांमुळे, टीनच्या बंद डब्यातील फ्रोजन कोबी आणि मटार खाऊन वैतागले होते आणि आपल्या जीभेवर नवीन स्वादाचा लेप चढवायला आतुर झाले होते. वखवखलेल्या नजरेने ते त्याच्याकडे बघत होते.

जवळच असलेल्या दुसर्‍या बंकरमधील कमांडरला वायरलेसवरून, इकडच्या बाजूच्या घटनेची ‘ब्रेकिंग न्यूज’ देत,  रखवालदाराने शावकाचा बळी देण्याची परवानगी मागितली. सगळी घटना ऐकल्यावर कमांडरच्या बाजूच्या बंकरवर काही काळ मौन पसरले. अवखळ रात्रीच्या कोलांटया उड्यांमुळे, त्या निरागस शावकाच्या काळजाची धडधड अधीकच वेगाने होऊ लागली होती.

किती क्षण उलटले, कुणास ठाऊक? इकडे आश्वस्त होणार्‍या शावकाच्या श्वासाबरोबरच तिथे बर्फगार मौन पसरलेलं. ‘गो अहेड’ ऐकण्यासाठी उतावीळ झालेलं. अचानक त्या पसरलेल्या मौनावर, वायरलेस रेडिओ- सेटवरून कमांडरचा, सक्त ताकीद देणारा आवाज उमटला…. अगदी सपाट, गुळमुळीत असा त्याचा तर्क होता. …’जो आपल्या प्राणरक्षणासाठी तुम्हाला शरण आला आहे, त्याचं भक्षण कसं करू शकता तुम्ही?’  वैतागाने पुटपुटणार्‍या पहारेकर्‍यांना कमांडरचा आदेश पाळणं भागच होतं. त्यांच्या हिरव्या वर्दीने त्यांच्यापुढे दुसरा विकल्प ठेवलेलाच नव्हता मुळी.

आत्तापर्यंत शांत आणि निश्चिंत झालेल्या शावकाला प्रथम डब्यातून काढलेले फ्रोजन मटाराचे दाणे खायला दिले गेले आणि नंतर आपल्या आजूच्या जंगलात त्याला सोडून दिलं गेलं.

सरहद्दीवरची ती बर्फाळ रात्र, आता हसत हसत पहाटेला बोलावत होती.

मूळ कथा –   रक्षक- भक्षक मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments