श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ गदिमा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव: गदिमा
तुम्ही लिहीले सहजपणाने शब्दांची काव्ये झाली
तुमच्या नुसत्या करस्पर्शाने लेखणी लीलया स्त्रवली.
मऊ मुलायम मधाळ भाषा तुमच्या ओठावरती
खेळविले तुम्ही सहज तियेला शब्द रांगले तुमच्या पुढती.
डफ कडकडला शाहिराचा तुमच्या कवनामधुनी
वसंत फुलला काव्यलतेवर खुलली अमृतवाणी.
आम्रवनातून मोर नाचले ॠतूमागूनी ऋतू चालले
मानवतेचे बांधून मंदिर जगण्याचे तुम्ही मर्मही कथिले.
असीम तुमच्या कर्तृत्वाला सीमित शब्दांची ही पूजा
सर्वांगाने बहरून गेला सिद्धहस्त कुणी इथे न दुजा.
रामजानकी गीतांमधूनी रामायण तुम्ही सहज गाईले
प्रतिभेचे तुम्ही बांधून तोरण माय मराठी विश्व सजविले.
चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈