सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ कवितेचा उत्सव ☆ महाराष्ट्राचा महाकवी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव: गदिमा
आहे का कुणी असे?
गदिमा, नाव तुमचे माहीत नसे?
महाराष्ट्राचे तुम्ही वाल्मिकी असती
गीत रामायण अजोड काव्यनिर्मिती…..
शेटफळे ही तुमची जन्मभूमी
नि पंचवटी असे कर्मभूमी
ओळख तुमची कवी,पटकथाकार
आणि कधी कधी अभिनय कलाकार…..
“एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्र माणसा तुझिया आयुष्याचे”
“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”
कथिती तत्वज्ञान जीवनाचे………….
शीघ्र काव्य तुमचे, स्वीकारती आव्हान
“ळ” मुळाक्षरांची गुंफण करून
“घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा”
जन्मास घातले तुम्ही अजरामर भक्तिगान……
गदिमा बाबूजी छान जमली जोडी
काव्यरसांत तुमच्या त्यांच्या भावभावनांची गोडी
विजेते तुम्ही साहित्य कला अकादमीचे
पद्मश्री तुम्ही भारतभूचे…………….
साहित्यासह घेतले व्रत समाजसेवेचे
होऊनी सभासद महाराष्ट्र विधान परिषदेचे
तुमचा माझा परिचय झाला विधानसभेत
एकोण्णीशेपाासष्ट साली असता मी शासनसेवेत
नाही लाभले दीर्घायुष्य तुम्हासी
अवघ्या पंचदश नि आठव्या वर्षी
निरोप दिधला जगाशी
महाराष्ट्राचे महाकवी तुम्ही वंदन चरणाशी….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈