☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 2 ☆ श्री आनंदहरी ☆
त्याने कुकर लावायचा म्हणून किचन कट्ट्याच्या ट्रॉलीमधून काढलेला कुकर तसाच कट्ट्यावर ठेवला आणि सोफ्यावर जाऊन बसला. मन एखाद्या माहेरवाशिणीसारखं गावासाठी ओढाळ झालं होतं. आई- वडील, गावातील घर, अंगण, त्याचा मळा, घराच्या परसात असणारा गोठा, त्यातील बैलजोडी, गाई-गुरं, तो शाळेत असतानाचे त्याचे सोबती या साऱ्यांच्या आठवणीत मन रमून गेलं होतं..
नोकरीसाठी इथं शहरात रहात असला तरी त्याच्या मनाच्या मोठया कप्प्यात अजूनही गाव नांदतं होतं. त्याला खूपदा वाटायचं की सारे सोडून तिथं जाऊन राहावं. त्याला गाव खूप आवडायचं पण ती तशी खेड्यातली असूनही तिला मात्र शहराचा लळा लागला होता.. गावाकडे जाऊया म्हणलं की तिची तयारी नसायची. सुरवातीला काही वेळेला तो एकटाच एक दोन दिवसासाठी गावी जायचा. तिथं गेला की आई- बाबा, शेजारी-पाजारी तिचीच चौकशी करायचे.. ती का आली नाही म्हणून विचारायचे. तो तिच्या न येण्याची काहीतरी थातूर – मातूर कारणं सांगायचा पण तशी कारणं सांगणेही त्याच्या जीवावर यायचं.
ते सारेच तिला घेऊन यायला सांगायचे. त्यांचेही बरोबरच होतं.. लग्नानंतर पहिल्या वर्षीच ती एक दोनदा तिथं आली होती.. त्यानंतर घरी जाऊया म्हणलं की तिने नकारघंटा वाजवायला सुरवात केली होती. तो कधीतरी एकटाच उभ्या उभ्या जाऊन यायचा. मनात खूप असले तरी तिच्यामुळे तो जाणे टाळायचा .या साऱ्याचा त्याला खूप त्रास व्हायचा. कधी कधी मन उद्विग्न व्हायचं. मनाची चिडचिड व्हायची. पण नंतर नंतर त्याच्या मनाने सारे स्वीकारायला सुरवातही केली होती. तो गावाकडे जाण्याचा विषयही तिच्यासमोर काढायचा नाही की तिला तसे सुचवायचाही नाही तरीही मनाच्या तळात कुठंतरी नैराश्य भरून राहीलं होतंच.
कितीतरी वेळ तो तसाच सोफ्यावर पडून याच विचारात गर्क झाला होता.त्याला भुकेची जाणीव झाली तसा तो उठला, बेसिनजवळ गेला. तोंडावर पाणी मारलं. तोंड पुसत असताना त्याचे लक्ष किचन कट्ट्याकडे गेलं. त्याने कट्ट्यावर कुकर तसाच ठेवला होता. ‘ राहू दे कुकर लावायचं.. बाहेरूनच जेवून येऊया..’ असा विचार मनात आला तसा तोंड पुसत पुसतच तो कट्ट्याजवळ गेला.त्याने ट्रॉली बाहेर ओढून कुकर जागेवर ठेवला. नॅपकिन जाग्यावर ठेवून त्याने शर्ट चढवला आणि बाहेर पडला.
बाहेर पडताच त्याची पावलं त्याच्या नेहमीच्या खानावळीकडे वळली. नोकरीला लागल्यापासून काही वर्षे तो तिथंच जेवत होता. तिथलं घरगुती साधे जेवण त्याला आवडायचं. घरगुती खानावळ असल्याने व्यावसायिकता नव्हती. घरगुती या शब्दप्रमाणेच स्वयंपाक करण्यात आणि वाढण्यात घरच्यासारखा आपलेपणा आहे असे त्याला नेहमीच वाटायचं, जाणवायचं.
“या.. बऱ्याच दिवसांनी आलात ? ‘ पुन्हा ब्रम्हचारी ‘ वाटतं ?”
हसत हसत आपलेपणाने खानावळवाल्या काकांनी स्वागत केलं. आपले जुने मेंबर लग्नानंतर बायको माहेरी गेली की जेवायला इथंच येतात हा अनुभव त्यांना होताच. तो ही मोकळेपणाने हसला. काकांची, मावशींची चौकशी केली.
तो दीड-दोन वर्षांनी आला असला तरी किरकोळ बदल सोडता सारे तसेच होतं. आपलेपणात जराही बदल झालेला नव्हता.
त्याला ते सारे वातावरण , तिथलं जेवण खूप आवडायचं. तो अनेकदा तिला म्हणाला होता, ‘ अगं , खाऊन तर बघ तिथलं जेवण..चेंज म्हणून कधीतरी जाऊ या जेवायला तिथं.. नाहीतर डबा आणतो तिथून.’… पण तिचा ठाम नकार असायचा. तिला हाय-फाय हॉटेलात जेवायला जायचं असायचं.. तेच तिला आवडायचं.
जेवून तृप्त मनाने बाहेर पडता पडता मावशी आतून बाहेर आल्या. त्यांनी त्याची, कधीही न पाहिलेल्या तिची चौकशी केली आणि म्हणाल्या,
“एकदा घेऊन या की मिसेसना.. ”
ती कधीच यायला तयार होणार नाही हे ठाऊक असूनही तो बाहेर पडता पडता हसत हसत आश्वासक स्वरात म्हणाला,
“हो. नक्की येतो. ”
येतो म्हणालो असलो तरी आपण तिला कधीही घेऊन येऊ शकणार नाही आणि ती ही येणार नाही..हे त्याला पक्के ठाऊक होते.. खानावळीतील वेळ तसा चांगला गेलेला होता .. पण परतताना मनात तिचाच विचार होता.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈