श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतर – भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मुंग्यांची फौज भाग २

दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात.

जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं,  तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात.

ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते,  तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात्  त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या, इतक्या मुंग्या असतात की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते.

जर नदी रुंद असेल,  तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मध्ये राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्‍या तिराला पोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते.

त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात.

पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल,  तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते.

त्या सतत कूच का करतात?  त्या कुठे जातात?  आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.

सगळ्यात दूरवरचं स्थलांतर

अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट दिशेकडे तोंड करून स्थलांतर करतात. या सर्वांमध्ये आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी सगळ्यात दूरवरच पल्ला गाठतात. त्याबाबतीत त्यांना स्थलांतर बहाद्दर किंवा उड्डाण बहाद्दरच म्हंटलं पाहिजे.

आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी स्थलांतर करतात, कारण उन्हाळी ऊबदार वातावरण वर्षभर त्यांच्याभोवती असावं असं त्यांना वाटतं. त्यांना दिवसभर प्रकाश असावा,  असं वाटतं. दरवर्षी स्लेंडर, काळे-पांढरे पक्षी ३५२०० कि.मी.चा वर्तुळाकार प्रवास करतात. ही म्हणजे, जगाभोवती केलेली प्रदक्षिणाच असते.

उन्हाळ्याच्या दिवसात अगदी उत्तरेच्या प्रदेशात ते घरटी करतात. यावेळी उत्तर धृव सूर्याकडे कललेला असतो. सूर्य जवळजवळ पूर्ण वेळ डोक्यावर असतो. या प्रदीर्घ सूर्यप्रकाशाच्य काळात त्यांना व त्यांच्या छोट्या पिलांना समुद्रातील भरपूर मासे दिसतात आणि पकडता व खाता येतात.

उन्हाळा संपत येता येता दिवस लहान होऊ लागतो. थंडी वाढत जाते आणि आर्क्टिक टर्न आपला प्रवास सुरू करतात आणि अंटार्टिकाला जातात. अलास्कन टर्न उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक सागराच्या किनारपट्टीवरून जातात. इतर अनेक टर्न उत्तरेकडच्या इतर घरटी बांधण्याच्या क्षेत्राकडे उडतात आणि ब्रिटीश बेटांमध्ये भेटतात. तिथून ते दक्षिणेकडे आफ्रिकन किनारपट्टीकडे झडप घेतात.

प्रवासाला सुरुवात करायची वेळ झाली, हे आर्टिक टर्नना कसं कळतं?

तापमानातील बदल, सूर्यप्रकाशातील बदल यामुळे बहुदा त्यांना ते कळतं. पण हे प्रवासी पक्षी इतकी भली मोठी आश्चर्यकारक राउंड ट्रीप दरवर्षी का घेतात, ते कुणालाच कळले नाही.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments