स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ ‘जोगिया’ –  महाकवी ग.दि. माडगूळकर  ☆ कवितेचे रसग्रहण ☆ प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

कोन्यात झोपली सतार,सरला रंग,

पसरलीं पैंजणे सैल टाकुनी अंग,

दुमडला गालिच्या,तक्के झुकले खाली

तबकांत राहिले देठ,लवंगा,साली.

 

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज

का तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज ?

थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी

ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

 

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,

निरखिसी कुसर वर कलती करूनी मान

गुणगुणसि काय ते ?- गौर नितळ तव कंठी-

स्वरवेल थरथरे,फूल उमलतें ओठीं.

 

साधतां विड्याचा घाट उमटली तान,

वर लवंग ठसतां होसि कशी बेभान ?

चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐने,

” कां नीर लोचनीं आज तुझ्या ग मैने ?”

 

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग-

हालले,साधला भावस्वरांचा योग,

घमघमे जोगिया दवांत भिजुनी गातां

पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

 

“मी देह विकुनियां  मागुन घेतें मोल,

जगवितें प्राण हे ओपुनिया ‘अनमोल’,

रक्‍तांत रुजविल्या भांगेच्या मीं बागा,

ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.

 

शोधीत एकदां घटकेचा विश्राम

भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,

सावळा तरुण तो खराच ग वनमाली

लाविते पान…तों निघून गेला खाली.

 

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,

पुसलेंहि नाहिं मीं मंगल त्याचें नांव;

बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी

‘मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !’

 

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार

बावळा तिथें हा इष्कां गणितो प्यार;

हांसून म्हणाल्यें, ‘ दाम वाढवा थोडा…

या पुन्हां पानं घ्या…’, निघून गेला वेडा !

 

राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,

जाणिली नाहिं मीं थोर तयाची प्रीत,

पुन:पुन्हां धुंडितें अंतर आता त्याला

तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?

 

तो हाच दिवस हो,हीच तिथी,ही रात,

ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,

वळुनी न पाहता,कापित अंधाराला

तो तारा तुटतो-तसा खालती गेला.

 

हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,

त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;

ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे

वर्षांत एकदां असा ‘जोगिया’ रंगे.”

 

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments