श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ दावा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
कसा अंदाज बांधावा प्रियेची साथ असण्याचा
इशारा समजतो मजला तिच्या नकली बहाण्याचा
घराच्या बंद दारानी उसासे सोडले काही
तिचा तो हुंदका होता मला संकेत देण्याचा
फुलाच्या पाकळीवरती दवाचा शोभतो बिंदू
जगाला भासतो मोती जरी तो थेंब पाण्याचा
नका थांबू कुणासाठी मशाली पेटवा काही
चला शोधू नवा रस्ता तमाच्या पार जाण्याचा
कुणी येतो कुणी जातो कशाला वावगी चिंता
तुझा तू मार्ग शोधावा भला माणूस बनण्याचा
इरादा पेरण्यासाठी धरावी आस मातीची
मिळाला जन्म मोलाचा स्वतःला सिध्द करण्याचा
कधी हसते कधी रुसते सखी आहे गझल माझी
खरा दावा गझल करते मनाला धुंद करण्याचा
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈