श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ तू व मी ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
तू कुंभाराचा आवा
मी माठ मातीचा
तुझ्या समर्पित ज्वाळा
माझा अहंकार स्वाहा…..
तू घण लोहाराचा
मी तप्त लोहगोळा
ऐरणीच्या दणक्यानी
माझा माणूस घडावा.
तू मांगठा विणकराचा
मी रंगारंगी सुत
तुझ्या विणण्याने
जीव तलम बनावा.
तू तेलीयाचा घाणा
मी बीज जवसाचे
तुझ्या रगड्याने
सत्व आविष्कृत व्हावे.
तुझी फुंकर सोनाराची
मी तुकडा धातूचा
तुझ्या कौशल्याने
तो सोन्याचाच व्हावा
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
02/12/2020
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈