सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन ( भाग २ ) – ख्याल गायकी☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद~धमार गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली. जौनपूर भागातील नियामत खाॅं या महंदशा राजाच्या दरबारी असलेल्या बीनवादकाने ख्याल गायकी लोकप्रिय केली.
ख्याल या शब्दाचा अर्थ विचार किंवा कल्पना! म्हणजेच ख्याल गायनांत कलावंताला श्रोत्यांपुढे राग सादर करतांना रागाचे सर्व नियम पाळून, आपल्या कल्पनाविलासाने रसिकांना रंजवायचे असते. गाण्यासाठी जी शब्दरचना केली असते तिला रागदारी संगीतात बंदीश अशी संज्ञा आहे.
वर नामोनिर्देश केलेल्या नियामतखाॅंने सदारंग या नावाने अशा अनेक बंदीशी रचल्या आणि त्यांच्या अंतर्यांत स्वतःच्या व महंमदशाच्या नावाचा त्याने उल्लेख केलेला आढळतो. ह्या पारंपारिक बंदीशी आजही गायल्या जातात.
बंदीशींचे दोन भाग असतात. एक अस्ताइ व दुसरा अंतरा! अस्ताई मंद्र व मध्य सप्तकांत गायली जाते व अंतरा मध्य आणि तार सप्तकात गायचा असतो असा नियम आहे. ह्रया बंदीशींचे दोन प्रकार. १) बडा ख्याल २) छोटा ख्याल.
बडा ख्याल विलंबीत म्हणजे अतिशय संथ गतीने(शास्त्रीय संगीतात ज्याला लय म्हणतात) गायला जातो. बडा ख्यालाच्या बंदीशी प्रामुख्याने विलंबीत एकताल,तीनताल,तिलवाडा,झुमरा इत्यादी तालात निबद्ध असतात. छोटा ख्याल कधी मध्य लय झपताल,रूपक किंवा द्रुतलयीत गायला जातो. द्रुतलय बंदीशी बहुधा तीनताल आणि एकतालातच गायल्या जातात.
ख्याल गायन सुरू करतांना रसिकांना रागाचे स्वरूप दाखविण्यासाठी रागाच्या वादी संवादी स्वरांवर अधिक आघात देऊन आकारात आलाप घेण्याची पद्धत आहे. (अलिकडचे बरेच गायक रिदनतोम् अशाप्रकारे आलापी करतांना आढळतात.) उदा. बागेश्री राग घेतला तर त्याचे वादीसंवादी स्वर अनुक्रमे मध्यम व षडज आहेत. तेव्हा गायक म~ध~कोमल नी~(मंद्र)~सा~~ अशी सर्व साधारण सुरवात करील. ह्या सुरांवरून शांतपणे आलाप घेत घेत साधारणपणे आपला कलाविष्कार दाखवत मध्य सप्तकांतील मध्यमापर्यंत येऊन पोहोचल्यावर बंदीश गाण्यास सुरवात करील.बरोबर सम मात्रेवर(तालाची पहिली मात्रा) आल्यावर साथीला असलेल्या तबल्याची पहिली थाप पडेल. ह्या समेवर जेव्हा श्रोत्यांची पहिली दाद मिळेल तेव्हा कलावंताने श्रोत्यांवर ताबा मिळविला असे समजावे. प्रत्येकवेळी बंदीशीचा मुखडा घेऊन वेगवेगळ्या ढंगांनी स्वरांशी खेळत खेळत तालाचे एक आवर्तन पूर्ण करून कलाकार जेव्हा श्रोत्यांना सम दाखवितो त्यावेळी मैफीलीत कलावंत व रसिक यांच्यांत सुसंवाद साधून चांगलाच रंग भरतो. पूरिया,दरबारी कानडा, बागेश्री, मालकंस,शुद्धकल्याण वगैरे रागांचा आवाकाच इतका मोठा आहे की एका आवर्तनांतील आलाप गुंडाळल्यासारखे वाटतात.अशा वेळी दोन आवर्तनेही घेतली जातात. आलापांद्वारे हळूहळू राग स्वरविस्तार करत तार षडजापर्यंत पोहोचल्यानंतर अंतर्याचे शब्द गाण्याची पद्धत आहे. गायक आपल्या आवाजाच्या क्षमतेनुसार जितके अधिक तार सप्तकापर्यंत जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न करतो.हे आलाप घेत असतांना विविध प्रकारे स्वरयोजना करून रागसौंदर्य खुलविणे हे गायकाचे कौशल्य असते. बोल आलापांतील रसास्वाद घेत असतानांच छोटा ख्याल किंवा द्रुतलयीतील गायन सुरू होते.कधी कधी गायक विलंबीत लयीतून मध्यलयीतील छोटा ख्याल गातात आणि द्रुत लयीत तराणा गाऊन गायन संपवितात. द्रुत लयीत आलाप न घेता बोलताना,वक्रताना,खटक्याच्या ताना,अलंकारिक अश्या विविध प्रकारच्या ताना घेऊन आपले गानचातूर्य सिद्ध करतात.
प्राचीन काळी गुरूगही राहून शिष्याने गुरूची सेवा करत संगीत साधना करण्याची प्रथा होती.
गुरू आपली वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. काही प्रतिभावंत कलाकारांनी आपली स्वतंत्र गायनशैली तयार करून शिष्यांकरवी ती जतन केली त्यावरून भिन्न भिन्न शैलीची घराणी तयार झाली. एकूण एकोणीस घराणी आहेत अशी नोंद आहे, परंतु ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर, मेवाती अशी काही घराणी आजही प्रसिद्ध आहेत.(घराण्यांची सविस्तर माहिती या लेखांत देत नाही,त्यावर एक स्वतंत्र लेखच होईल.)
आधुनिक काळांत गुरूकुल पद्धती राहिली नाही परंतु तयार शिष्याला रियाज करून आणि निरनिराळ्या पद्धतीने केलेले गायन ऐकून स्वतःची गायन शैली प्रस्थापित करण्यांत अधिक आनंद मिळतो. सहाजिकच कट्टर घराणेशाही आज अस्तंगत होत चालली आहे.
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मैफिलीत पेश होणाऱ्या एखाद्या रागाची बढत खूप छान व सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे अरुणाताई मुल्हेरकर ह्यांनी. समजावून सांगण्याची शैली व कसब खूपच वाखाणण्यासारखी आहे जी त्या विषयाच्या सखोल ज्ञानानेच येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
चारुदत्त नायगावकर
ठाणे