सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कुठल्याही देशप्रेमी भारतीयाला अभिमान वाटावा, असे त्यांचे भाषण होते.अशा स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे,  हातापायात बेड्या, साखळदंड पडले. दुस-याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नव्हतं. तुरुंगात ” गीता ” व ” बायबल” हे दोन ग्रंथ जवळ बाळगण्यावरून खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी आमरण उपोषण केले. अफवा उठली होती की देशपांडे या उपोषणामुळे मरण पावले.घरचे सगळे हादरून गेले. पण देवाच्या कृपेने ती अफवाच ठरली. सोळा दिवसानंतर सरकार शरण आले, व ग्रंथ त्यांना परत देण्यात आले. देशपांडेना दुस-या तुरूंगात हलवण्यात आले. ते शांतपणाने शिक्षा भोगणा-यातले नव्हते. बंडखोर वृत्ती आणि अन्यायाची चीड   त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना 1954 मध्ये पोर्तुगाल मधील लिस्बनच्या तुरूंगात रवाना केले.तेथे त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. केवळ छळ करायचा म्हणून.  ते मनोरुग्ण नाहीत, हे डाॅक्टर्स व इतर स्टाफला माहीत होतं. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळत होती. इतर मनोरुग्णांच्या त्रासापासून दूर ठेवले जाई. 19 डिसेंबर 1960 ला गोवा स्वतंत्र झाल्यावर 1962 साली त्यांची सुटका झाली व ते भारतात परत आले.

सर्व परिवारा समवेत ते वास्को येथे राहू लागले. Indian National Trade Union Congress ( INTUC) च्या गोवा ब्रॅचची स्थापना त्यांनी केली. व INTUC चे गोव्यातील पहिले अध्यक्ष झाले. गोवा डाॅक लेबर युनियन, टॅक्सी युनियनचे ते नेता होते. प्राथमिक शिक्षकांच्या युनियन चे ते अध्यक्ष होते. जात-पात, धर्म,  भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचा नेता म्हणून लोकांच्या विविध प्रश्नांना, तक्रारींना न्याय मिळवून देण्याचे व्रत त्यांनी घेतले.जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न किंवा गुंतागुंत सोडविण्यास सरकार असमर्थ ठरले, तेव्हा तेव्हा स्वतः त्रास सोसून लोकांसाठी उभे ठाकण्यास आणि   लढण्यास ते सज्ज झाले आणि यशस्वी झाले.माणूस मोठा धडाडीचा. त्यांच्या प्रत्येक शब्दात आंतरिक तळमळ होती. प्रत्येक कृतीत परिपूर्णता होती. प्रेमळ स्वभाव, उदार अंतःकरण,  सहानुभूती,  कुटुंबाबद्दल जिव्हाळा, सगळंच उधाणलेलं होतं. असं अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व..

19 डिसेंबर 1960 ते 2020, साठ वर्षे झाली गोवा स्वातंत्र्य लढ्याच्या यशस्वी घटनेला. त्या निमित्ताने सर्व  स्वातंत्र्य सैनिकांना आणि माझे मोठे दीर कै. दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मृतीला नम्र

अभिवादन! ??

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments