सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ९) – बिलासखानी तोडी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

एखाद्या रागाबाबत अनभिज्ञ असताना त्यातली एखादी रचना आपल्याला माहीत असलेल्या दुसऱ्या एखाद्या रागाशी अगदी मिळतीजुळती वाटत असेल तर आपण बिनधास्त ती रचना  माहीत असलेल्या रागातली मानून टाकतो. मी लहान असताना माझ्याबाबतीत हेच झालं होतं. अगदी लहान म्हणजे चवथी-पाचवी इतपतच वय असताना कुठंतरी थोडावेळ गायचं असेल त्यावेळी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं गायली जायची. राग स्वतंत्रपणे गाण्याएवढं शिक्षण, समज काहीच तेव्हां नव्हतं. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी गायची हे माहीत असल्यानं भैरवीतल्या काही रचना हमखास शिकून तयार केलेल्या असायच्या. त्यापैकी तेव्हांची एक आवडती रचना म्हणजे ‘रामा रघुनंदना’!

कितीतरी वेळा ही रचना मी भैरवी म्हणून अशा माझ्या छोट्याशा कार्यक्रमाच्या शेवटी म्हटली होती. नंतर मग रचनांचा किंचित विस्तार जमायला लागला तसे दुसरे अभंग भैरवी म्हणुन गात आळवणं आवडायला लागलं आणि ही रचना मागं पडली. परंतू, पुढं कधीतरी कळलं कि, ही रचना भैरवीतली नसून राग बिलासखानी तोडीवर आधारित आहे. मग मला ती भैरवीच का वाटली? तर भैरवी रागातीलच सुरांचा वापर ह्या रागात आहे. फरक इतकाच कि आरोहात सा (रे) (ग) प (ध) सां आणि अवरोह (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा. त्यामुळं जोवर बिलासखानी तोडी माहीत नसतो तोवर त्यातल्या रचना ह्या भैरवीवर आधारीत वाटूच शकतात.

बिलासखानी तोडी ह्या रागामागे आणि त्याच्या नावामागे एक कथा आहे. नावांत बिलासखानी येण्याचे कारण म्हणजे हा राग बिलासखॉं ह्यांनी निर्मिला असं मानलं जातं म्हणून ‘बिलासखानी’! हे बिलासखॉं म्हणजे कलासक्त अकबराच्या नवरत्नांपैकी एक, ज्यांच्या सुराला खुद्द निसर्गही प्रतिसाद द्यायचा, ज्यांनी मल्हार गायला कि वरुणराज प्रसन्न होऊन पाऊस कोसळायचा आणि दीपक गायला तर अग्निदेवता प्रसन्न होऊन दीप प्रज्वलित व्हायचे अशा कथा आपण ऐकतो त्या प्रतिभावंत, प्रभावी गायक तानसेन ह्यांचे सुपुत्र!

तानसेन निवर्तले त्यावेळी बिलासखॉं त्यांच्याजवळ नव्हते. ते घरी पोहोचल्यावर आपल्या पित्याचे पार्थिव पाहून त्यांना शोक अनावर झाला आणि काळीज पिळवटलेल्या त्या अवस्थेत ते गाऊ लागले. त्यांचे ते गायन इतके प्रभावी होते कि काही क्षणांसाठी तानसेन जागृतावस्थेत आले आणि पिता-पुत्रांची भेट घडल्यावर त्यांनी परत प्राण सोडले.

ह्या सर्वच कथा आपल्याला ‘फॅंटसी’ किंवा ‘जादूच्या कथा’ वाटू शकतात. पण त्या पूर्णपणे नाकारणार तरी कशा? कारण सूर हाही साधनमार्ग आहेच कि! फक्त देवता प्रसन्न व्हाव्यात अशी साधना करणाऱ्यालाच सुरांचं सामर्थ्य, शक्ती, प्रभावीपणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार! तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे कसं साधावं!?

ह्या रागाच्या आरोह-अवरोहाची तुलना भैरवी रागाच्या आरोह-अवरोहाशी केल्यावर लक्षात येतं कि सगळे सूर तेच असतील तरी भैरवी हा संपूर्ण जातीचा राग आहे आणि बिलासखानी तोडी हा ओडव-षाडव जातीचा राग आहे. जाती म्हणजे काय? तर ही फक्त राग वर्गीकरणाची एक पद्धत आहे. रागाच्या आरोह-अवरोहातील स्वरसंख्येवरून त्या-त्या रागाची जाती ठरते. मागे आपण रागात किमान पाच सूर असावे लागतात हा नियम पाहिला आणि सप्तकातील एकूण सूरसंख्या सात आहे. (सुराचं व्हेरिएशन/विकृत स्वर हा जातीपद्धतीत वेगळा सूर मानला जात नाही) त्यानुसार रागात किंबहुना आरोह-अवरोहात पाच किंवा सहा किंवा सात सूर असणार हे निश्चित!

ज्या रागांमधे म्हणजे आरोह-अवरोह दोन्हींत पाच सूर असतात तो ओडव जातीचा राग असतो, ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सहा सूर असतात तो षाडव जातीचा राग असतो आणि ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सात सूर असतात तो संपूर्ण जातीचा राग असतो. परंतू कोणत्याही  रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या सारखीच असते असं नाही आणि तसा नियमही नाही. म्हणून तर बिलासखानी तोडी आणि भैरवी हे दोन वेगळे राग निर्माण झाले!?

ज्या रागांमधे आरोह व अवरोहातील स्वरसंख्या वेगळी आहे त्या रागाची जाती लिहिताना आधी आरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहून मग त्यापुढं एक छोटी आडवी रेघ काढून अवरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहायचे. ह्याचप्रकारे ‘सा (रे) (ग) प (ध)  सां’ असे पाच सूर म्हणून ओडव व अवरोहात (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा असे सहा सूर म्हणून षाडव, ह्यानुसार बिलासखानी तोडीची जाती ‘ओडव-षाडव’ झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आरोह लिहिताना सा ते वरचा सा पर्यंतचे रागातील सूर आणि अवरोहात वरच्या सा पासून खाली येतानाचे सूर असं लिहितो. त्यामुळे सा किंवा कोणताच सूर वेगळ्या सप्तकातील असेल तरी ते दोन सूर वेगळे मोजण्याची आवश्यकता नाही. उदा. सुरुवातीचा(मध्य सप्तकातला) सा आणि वरचा(तार सप्तकातला) सां हे सूर वेगळे मोजायचे नाहीत.

ह्या रागाबाबतची गंमत म्हणजे नावात तोडी आहे तरी ह्याचा थाट तोडी नसून भैरवी आहे. म्हणजे रे, ग, ध कोमल असले तरी म आणि नि हे सूर तोडी थाटाप्रमाणे अनुक्रमे तीव्र व शुद्ध नाहीत तर भैरवी थाटाप्रमाणे अनुक्रमे शुद्ध आणि कोमल आहेत.(मागे बिभास रागाच्या दुसऱ्या भागात आपण सर्व थाटांविषयी माहिती घेतली आहे.) मग नावात तोडी कशी आली? तर, तोडीची काही ठळक वैशिष्ट्ये घेऊनच हा राग गायला जातो, मात्र सुरांनुसार थाट आहे भैरवी! शांत व गंभीर प्रकृतीचा हा राग दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. लेकिन ह्या चित्रपटातल्या ‘झूठे नैना बोले सांचि बतियॉं’ ह्या रचनेला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी बिलासखानीचा साज चढवून फार देखणं केलं आहे!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4.2 5 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments