☆ जीवनरंग ☆ बोध कथा – संस्कार प्रभाव ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा १२. संस्कार प्रभाव
विंध्यपर्वतावर एका वटवृक्षावर पोपटाचे जोडपे वास करत होते. त्यांना राम व लक्ष्मण अशी दोन पिल्ले होती. एकदा एका व्याधाने जाळे पसरवून त्या दोघांना पकडले. गोदावरी तीरावर राहणाऱ्या एका साधूला राम विकला व एका कसायाला लक्ष्मण. त्या दोघांनीही छोट्या पोपटांचे प्रेमाने लालन पालन केले. आता त्या पिल्लांचे मातापिता वृद्ध झाले होते. राम व लक्ष्मणाच्या आठवणीने ते व्यथित होत होते. त्यांना त्या दोघांच्या भेटीची ओढ लागली होती. आता दोघांना शोधूनच काढायचा त्यांनी निर्धार केला. त्यानुसार ते जोडपे पर्वतांवर, झाडांवर, गावांमध्ये, उद्यानात, देवळांत, राजवाड्यात इत्यादी सर्व ठिकाणी पिल्लांना शोधत कालांतराने गोदावरीच्या तीरावर आले. तेथे साधूच्या कुटीत व कसायाच्या घरात मधुर कूजन करणाऱ्या, पिंजऱ्यात असलेल्या आपल्या पिल्लांना बघून ते खूप आनंदित झाले .
प्रथम त्या जोडप्याने साधू जवळ येऊन त्याला प्रणाम केला व पिंजऱ्यातील पोपट आमचा पुत्र आहे असे सांगितले. तेव्हा साधूने त्या वृद्ध पोपटांना काही दिवस आदराने स्वतःच्या कुटीत ठेऊन घेतले. साधूने कसायाघरचा पोपटही काही मूल्य देऊन विकत घेतला व दोन्ही पिल्ले वृद्ध पोपटांना दिली. ते जोडपे काही दिवस पिल्लांसह आनंदात राहिले व नंतर मृत्यू पावले. माता-पित्याच्या मृत्युनंतर राम-लक्ष्मणाला एकत्र राहणे अशक्य झाले. ते दोघेही वेगवेगळ्या आम्रवृक्षांच्या फांदीवर घरटे बांधून राहू लागले.
एक दिवस कोणी एक ब्राह्मण नदीवर स्नानासाठी जात असताना थकून लक्ष्मण रहात असलेल्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. त्याला पाहून लक्ष्मण इतर पक्ष्यांना बोलावून “हा कोणी मनुष्य आला आहे. त्याचे चोचीने डोळे टोचून गळा फोडून खाऊ या” असे जोरजोराने ओरडू लागला. त्याचा तो आक्रोश ऐकून त्रस्त झालेल्या ब्राह्मणाने तेथून पळ काढला, व तो थेट राम रहात असलेल्या झाडाखाली आला.
ब्राह्मणाला पाहताच राम इतर पक्ष्यांना म्हणाला, “हा कोणी थकलेला मनुष्य आला आहे. आपण वृक्षाच्या पानांना जमिनीवर टाकूया, जेणेकरून हा सुखाने त्यावर बसू शकेल. फळेसुद्धा खाली टाकू व या अतिथीचे स्वागत करू.” ते रामशुकाचे बोलणे ऐकून ब्राह्मण आनंदित झाला. त्याने त्या पोपटाला विचारले, “मला प्रथम भेटलेला शुक ‘याला मारा, मारा’ असे ओरडत होता आणि तू तर माझे आतिथ्य करा असे सांगतो आहेस. हे कसे?” तेव्हा रामशुक म्हणाला, “आम्ही दोघे बंधू आहोत. मी साधूच्या घरी वाढलो. तिथे मी साधूला सगळ्यांचे आतिथ्य करताना पहिले. म्हणून माझी बुद्धी तशी संस्कारित झाली. तो कसायाच्या घरी वाढला. तिथे त्याने बोकड, मेंढे वगैरे मारताना पहिले, म्हणून त्याची बुद्धी तशी संस्कारित झाली.”
तात्पर्य – दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींची पूर्वी जशी दुर्बुद्धी असते, त्याचप्रमाणे ते वर्तन करतात. वृद्धावस्थेत सुद्धा त्यांची दुर्बुद्धी नष्ट होत नाही आणि सुबुद्धी जागृत होत नाही.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी