सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन ( भाग ३ ) – उपशास्त्रीय गायन~ ठुमरी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
उपशास्त्रीय गायनात मुख्यत्वे करून ठुमरी/नाट्य संगीत आणि अभंग/भजन हे तीन प्रकार दिसून येतात. हे गायन तानसेनांपासून कानसेनांपर्यंत सर्वच वर्गांत लोकप्रिय आहे. कोणत्याही शास्त्रीय संगीताच्या बैठकीत श्रोत्यांची आता एखादी ठुमरी होऊ द्यावी किंवा नाट्य पद सादर करावे अथवा एखादा अभंग होऊन जावा अशी फरमाईश असतेच!
आजच्या लेखांत म्हणूनच ठुमरीविषयी थोडेसे!
ठुमरी, कजरी, होरी, चैती असे बरेच प्रकार या वर्गांत येतात. भरताच्या नाट्यशास्त्रात उल्लेखिलेल्या धृवगीताशी ठुमरीचे नाते जोडतां येते. त्याचप्रमाणे महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्नीमित्र या नाटकांतील नायिकेने गायिलेल्या चतुष्पदी या चार पदांच्या गीतात ठुमरीचे मूळ दिसून येते. देवळांत गायल्या जाणार्या होरी~धमारांतही ठुमरीची बीजे आढळतात. औरंगजेबकालीन रागदर्पण या ग्रंथातही ठुमरीचा उल्लेख आहे. यावरून ठुमरी हा गानप्रकार प्राचीनच आहे, परंतु ठुमरी लोकप्रिय झाली एकोणीसाव्या शतकांत!
ठुमक या शब्दावरून ठुमरी हा शब्द आला असावा कारण ठुमरीचे स्वरूप म्हणजे लय आणि भाव हे साज चढवून ठुमकत ठुमकत चालणारी ती ठुमरी! नृत्यगीत, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत या सर्वांशी ठुमरीचे अजोड नाते आहे.
ठुमरी गायनांत आकारान्त आलाप आणि तानबाजीची अपेक्षा नसते. गायन अधिक भावपूर्ण होण्यासाठी शब्दोच्चारांना विशेष महत्व आहे तसेच ठुमरीचे बोल घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आलापाने रंग भरला जातो. “सैंय्या बिन घर सूना” म्हणतांना ही एकच ओळ इतक्या प्रकारे आळविली जाईल की त्या नायिकेचे सूनेपण, एकटेपणा श्रोत्यांना जाणविल्याशिवाय रहाणार नाही व याच टप्प्यावर कलावंताला ‘वाहवा’ अशी दाद मिळेल.
या शैलीत राग नियम पाळण्याचे मुळीच बंधन नसते. मूळ पहाडीतील ठुमरी गातां गातां तो अगदी सहजपणे कोमल रिषभ, धैवत घेऊन जोगिया, भैरवीचे रसिकांना दर्शन घडवून पुन्हा मूळ रागांत गायन सुरू करील. कलावंताचे सुरावरचे हे नियंत्रण जितके पक्के तितके त्याचे गायन प्रभावी.
ठुमरीचा अंतरा गाऊन झाला की ताल बदलून, द्रुत लय घेऊन साधारणतः केरवा तालात ठुमरीचा पुन्हा मुखडा गाण्याची पद्धत आहे, ह्या प्रकाराला गायक व तब्बलजी यांची लग्गी लागणे असे म्हणतात. लग्गी लागतांना श्रोत्यांचे खास मनोरंजन होऊन ते माना डोलवायला लागतातच.
लग्गीमध्येही कलावंत निरनाराळ्या ढंगाने गाऊन आपले कसब दाखवतो आणि तिहाई घेऊन पुन्हा मूळ तालांत व लयीत एकदां मुखडा गाऊन ठुमरी गायन समाप्त होते.
खमाज तिलंग, काफी, मांड, पिलु, देस, तिलककामोद, पहाडी, झिंझोटी, जोगिया भैरवी, सिंधभैरवी हे ठुमरीचे प्रमूख राग आहेत. कारण हे राग लोकधुनांवर आधारित आहेत. दीपचंदी, दादरा, सूलताल, मत्तताल इत्यादी तालांत प्रामुख्याने ठुमरी निबद्ध असते.
सासू~नणंदेची गार्हाणी, प्रियकराची वाट पहाणारी प्रेयसी, सवती सोबत रमलेला पति हे ठुमरीचे विषय. अष्टनायिकांचे दर्शन, स्त्रीचे समाजांतील उपेक्षित स्थान,
पुरूषप्रधान संस्कृतीने तिच्याकडे भोग्य वस्तू म्हणून पाहिले, त्या काळाचे समाजाचे प्रतिबिंब ठुमरीच्या आशयांत दिसून येते. राधा कृष्णाचे प्रेम हा ठुमरीचा अगदी लाडका विषय. ” कौन गली गयो श्याम”, राधे बिन लागे ना मोरा जिया” ह्या गिरिजादेवींच्या ठुमर्या प्रसिद्ध आहेत. ठुमरीच्याच झूला, होरी या प्रकारांमध्ये कृष्ण~गोपी यांच्या क्रीडेची विविध रूपे दिसतात. “झूला धीरेसे झुलावो बनवारी रे सांवरियाॅं”, “झूला झूले नंदकिशोर” हे पारंपारिक झूले आहेत. “छैलवा ना डारो गुलाल”, “बिरजमे होरी कैसे खेलू”, “होरी खेलत है गिरिधारी” ही कवने होरीची उदाहरणे देता येतील. “पिया तो मानत नाही” ही काफी रागांतील भीमसेनजींची ठुमरी न ऐकलेले रसिक अपवादात्मकच!”का करू सजनी आये ना बालम” ही देस रागांतील प्रसिद्ध ठुमरी बरेच गायक/गायिका गातात. यावरून लक्षांत येते की ठुमरी म्हणजे शृंगार रसाचा परिपोष; परंतु त्याचबरोबर ठुमरीत भक्ति आणि अध्यात्मही असते हे लक्षात असू द्यावे. संत कबीराच्या निर्गूण पदावर तिलककामोद रागात असलेल्या ठुमरीचा हा एक नमूना!
“चिलम भरत मोरी जर गयी चुटकिया सैय्या निरमोहीके राज रे”— अर्थात ह्या ऐहिक जीवनात मी होरपळलोय, मला मोहपाषांतून सोडव. सूरदासांची, मीराबाईंची पदे अनेक सिद्धहस्त गायकांनी ठुमरी शैलीत गायली आहेत.
“सोच समझ नादान” हे पिलू ठुमरीत भीमसेनजींनी गायलेले कबीर भजन किंवा “सांझ भई घर आवो नंदलाल” ही सिद्धेश्वरी देवींनी गायिलेली ठुमरी. या सुरांना अध्यात्मिकतेचा स्पर्ष आहे. ” सांझ भई” म्हणजे माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली, तेव्हा हे भगवंता आता तरी मला दर्शन दे असा ह्या ठुमरीचा पारमार्थिक अर्थ सांगितला जातो.
कजरी हा ठुमरीचाच एक प्रकार. श्रावण महिना, वर्षा ऋतु व विरहावस्था हे कजरीचे विषय. ” सावनकी ऋतु आयी रे सजनिया प्रीतम घर नही आये” ही शोभा गुर्टूंची कजरी गाजलेली आहे.
चैती म्हणजे ज्या ठुमरीत चैत्र महिन्याचे वर्णन असते. उदा~अंबूवाके डारीपे कूजे री कोयलिया.
राम जन्माचा सोहळा चैतीत वर्णन केलेला दिसतो.
टप्पा हा गानप्रकार ठुमरीहून थोडा वेगळा आहे. पंजाबमधील लोकसंगीत हे टप्प्याचे उगमस्थान. तिकडचे उंट हांकणारे सारवान हे गात असत म्हणून ह्या शैलीला टप्पा असे नांव पडले. पंजाबी, अवध, भोजपूरी, व्रज या भाषेत टप्पे लिहिलेले आढळतात. ग्वाल्हेर घराण्याचे गायक टप्पा गायल्याशिवाय आपल्या मैफिलीची सांगता करीत नाहीत.
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈